हैदराबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा नुपूर शर्माच्या अटकेची मागणी केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, भाजप 6-7 महिन्यांत नुपूर शर्मा यांना परत आणेल आणि त्यांना एक मोठ्या नेत्या म्हणून समोर आणले जाईल. दिल्लीत त्यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बनवले जाऊ शकते, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. दरम्यान, हैदराबादमध्ये युनायटेड अॅक्शन फोरमने आयोजित केलेल्या परिषदेत नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करत भाजपविरोधात निषेधाचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. यावेळी असदुद्दीन ओवेसी बोलत होते.
प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपमधून निलंबित केलेल्या नेत्या नुपूर शर्मा यांच्याबाबत असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, "नुपूर शर्मा यांच्यावर भारतीय कायद्यानुसार आणि घटनेनुसार कारवाई व्हायला हवी. अटक झाली पाहिजे. नुपूर शर्माविरुद्ध पहिली एफआयआर हैदराबादमध्ये नोंदवण्यात आली होती. मी पोलिस प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, तुमचे पोलिस दिल्लीला पाठवा आणि नुपूर शर्माला आणा. फक्त एफआयआर करून काय होणार? काहीतरी करा. निदान त्यांना आणायला तुम्ही दिल्लीला जात आहात असे सांगा."
याचबरोबर, पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ, ममता बॅनर्जी यांच्या विरोधात कोणीही काहीही बोलले की त्यांना अटक केली जाते, पण जेव्हा कोणी पैगंबर विरोधात काही बोलतो, तेव्हा तुम्ही त्यांना अटक केली जात नाही, असे का? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केला. तसेच, त्यांनी भाजपवर नुपूर शर्माला वाचवल्याचा आरोप केला. असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, "मला खात्री आहे की त्या (नुपूर शर्मा) 6-7 महिन्यांत परत येतील. तो एक मोठ्या नेत्या म्हणून त्यांना समोर केले जाईल. त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही केले जाऊ शकते."
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त ब्लॉगमध्ये त्यांचा बालपणीचा मित्र अब्बासचा उल्लेख केल्याबद्दल असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, "अब्बास भाईला फोन करा आणि त्यांना ओवेसीचे भाषण ऐकवा, मग त्यांना विचारा की मी काय म्हणतोय ते बरोबर की चूक." याशिवाय, अग्निपथ योजनेबाबतही असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप केला, त्यामुळे तरुण रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी देशातील तरुणांना उद्ध्वस्त करण्याचा मार्ग शोधला आहे. आता त्यांचे घर पाडण्यासाठी किती बुलडोझर वापरणार? तुम्ही कोणाचेही घर उध्वस्त करू नये अशी आमची इच्छा आहे. यूपी सरकार बुलडोझर वापरत असल्याची टीकाही असदुद्दीन ओवेसी यांनी केली.