नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत महावीर एन्क्लेव्ह पार्ट १ येथील रहिवासी असलेल्या नर्स पूनम यांचा मृत्यू झाला. पूनम दोन मैत्रिणींसोबत प्रयागराजसाठी निघाल्या होत्या. पण स्टेशनवर अचानक झालेल्या चेंगराचेंगरीमुळे त्यांचा जीव गेला. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आणि ते सरकारकडे न्याय आणि मदतीची याचना करत आहेत.
कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम आणि त्यांच्या मैत्रिणींचं ट्रेनचं रिजर्व्हेशन नव्हतं. त्या रात्री प्रयागराजला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी नवी दिल्लीरेल्वे स्टेशनवर पोहोचल्या होत्या. पहिली ट्रेन रात्री ८ वाजता चुकली, त्यानंतर रात्री ९ वाजताची ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होत्या. याच दरम्यान पूनम यांनी मुलाशी फोनवर संपर्क साधला आणि त्याला सांगितलं की, स्टेशनवर खूप गर्दी आहे आणि त्या घरी परतण्याचा विचार करत आहेत.
यानंतर पूनम यांचा फोन बंद झाला आणि काही वेळाने कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रात्रीच्या वेळी स्टेशनवर चेंगराचेंगरी झाल्याची बातमी आली आणि त्यात अनेक लोक जखमी झाले. जेव्हा पूनमशी संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा तिचा पती वीरेंद्र आणि मुलगा अक्षित रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत अनेक रुग्णालयांमध्ये जाऊन त्यांचा शोध घेत होते.
कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की, ते आरएमएल हॉस्पिटल, लेडी हार्डिंग हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटल आणि इतर अनेक ठिकाणी गेले. पण पूनम कुठेही सापडल्या नाहीत. रुग्णालय प्रशासनाकडूनही त्यांना कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नव्हती आणि ते रात्रभर फिरत राहिले. अखेर, त्यांना माहिती मिळाली की पूनम यांचा मृत्यू चेंगराचेंगरीत झाला आहे.
पूनम यांचे पती वीरेंद्र यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा अक्षित रात्रभर त्याच्या आईचा शोध घेत होता पण त्याला योग्य माहिती देण्यासाठी कोणीही नव्हतं. प्रशासनाने योग्य वेळी माहिती दिली असती तर कदाचित त्यांच्या समस्या कमी झाल्या असत्या असं कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे. आता कुटुंब सरकारकडे मदतीची याचना करत आहे आणि घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत आहे. चेंगराचेंगरीमागील खरी कारणं शोधून काढावीत आणि दोषींवर कारवाई करावी अशी त्यांची इच्छा आहे.