हरियाणातील महेंद्रगडमधील एका लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. खराब हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक लक्षात घेऊन हुंडा न घेता ११ रोपं भेटवस्तू म्हणून देण्यात आली आहेत. या अनोख्या लग्नात नवरदेव अवशेष यादव आणि वधू वंदना यांनी हुंडा प्रथेचा विरोध केला आणि पर्यावरण रक्षणाचं आवाहन केलं. या लग्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक बिजेंद्र यादव हे झज्जर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत तैनात आहेत. त्यांच्या या भिवानी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेविका आहेत. १ रुपया आणि ११ रोपं घेऊन त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस युवा जागृत सेवा समिती आणि सदाचारी शिक्षा समिती यांच्या अभियानातून प्रेरित होऊन त्यांनी हा निर्णय घेतला.
लग्नादरम्यान झज्जरच्या लीलाहेरी येथील अवशेष आणि नारनौलची वंदना यांनी लग्न केलं आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून प्रत्येक समाजाने आदर्श घेऊन पर्यावरणाचं रक्षण करावं आणि स्त्रियांचा सन्मान करण्यासाठी पुढे यावं असं नवरा-नवरीच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाने कहर केला आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी मिळून समाज सुधारण्याचं काम केलं पाहिजे असंही सांगितलं.
अवशेष आणि वंदना यांनी सांगितलं की, त्यांनी त्यांच्या लग्नात अनोखा संकल्प केला आहे. एक रुपया आणि ११ रोपं घेऊन लग्न केलं आहे. या अभियानात प्रत्येक समाजाने सहभागी होऊन पुढे यावं, असंही म्हटलं. आमच्या दोन्ही कुटुंबांनी हुंडा न घेता लग्नाचा निर्णय एकमताने घेतला आणि तो पूर्ण केला. समाजाने आमच्या मोहिमेत सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. न्यूज १८ हिंदीने याबाबतचे वृत्त दिलं आहे.