नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. हातावरचं पोट असणाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आता मिळेल ते काम करायला सुरुवात केली आहे. काहींनी परिस्थितीसमोर हार न मारता नवनवीन मार्ग शोधले आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली पण तिने हार नाही मानली. स्विगी डिलिव्हरी गर्ल होऊन ती घर चालवून कुटुंबाचं पोट भरत आहे. संजुक्ता नंदा असं या 39 वर्षीय महिलेचं नाव आहे.
भुवनेश्वरधील गढकना गावात नंदा राहतात. गेल्या दोन वर्षांपासून त्या एका खासगी डेंटल क्लिनिकमध्ये नर्स म्हणून काम करत होत्या. मात्र कोरोनातील लॉकडाऊनमध्ये डेंटल क्लिनिक बंद झालं आणि नंदा बेरोजगार झाल्या. यानंतर काही दिवसांनी त्यांच्या पतीची देखील नोकरी गेली. त्यामुळे घर चालवणं त्यांना कठीण होऊन बसलं. त्यामुळे नंदा यांनी फूड कंपनी स्विगीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्या डिलिव्हरी गर्ल झाल्या. आपल्या स्कुटीने दिवसभरात जवळपास त्या 10 ते 15 फूड डिलिव्हरी अगदी वेळेत करतात.
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची
नंदा कोरोनाआधी एका डेंटल क्लिनिकमध्ये काम करत होत्या. पण क्लिनिक बंद झाल्याने बेरोजगार झाल्या. याच दरम्यान पतीची देखील नोकरी गेली. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने कुटुंबाचा सांभळ करणं अवघड झालं. सुरुवातीला आम्ही आमच्या काही नातेवाईकांकडून, ओळखीच्या लोकांकडून पैसे उधार म्हणून घेतले. पण ते संपून गेले. घरात पैसे नसल्याने मुलाचं शिक्षण देखील थांबवावं लागलं. अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याचं म्हटलं आहे.
तीन महिन्यांपासून स्विगीसाठी डिलिव्हरी गर्लचं काम
"एका नातेवाईकाने स्विगीबाबत माहिती दिली. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून स्विगीसाठी डिलिव्हरी गर्लचं काम करत आहे. शहरामध्ये अन्न पोहचवण्यासाठी सकाळी आठ वाजता घरातीन बाहेर पडते आणि दुपारी परत येते. यासाठी पैसे देखील मिळतात. त्यातूनच कुटुंबाचं पोट भरते. यामध्ये माझे पती देखील माझ्यासोबत आहेत. ते देखील मला खूप मदत करतात" अशी माहिती नंदा यांनी दिली आहे. परिस्थितीसमोर खचून न जाता, निराश होता नंदा आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी धडपत करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.