जयपूर : बाळाच्या जन्माबद्दल त्याच्या कुटुंबीयांनी भेट (बधाई) म्हणून ३०० रुपये द्यावेत यासाठी सुईणीला मदत करणारी परिचारिका नीतू गुर्जर हिने या नवजात मुलीला हीटरच्या जवळ ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चुरू जिल्ह्यात सरकारी दवाखान्यात हा प्रकार घडला. त्यात नवजात मुलीच्या चेहऱ्यावर सौम्य भाजल्याची इजा झाली आहे. गुर्जरला त्या दवाखान्यातून हलवण्यात आले असून इतर कर्मचाऱ्यांचा विभाग बदलण्यात आला आहे. माया नावाच्या महिलेने सोमवारी आरोग्य केंद्रात मुलीला नैसर्गिक बाळंतपणात जन्म दिला. त्यानंतर लगेचच नीतू गुर्जरने ३०० रुपये भेट म्हणून मिळण्यासाठी त्या अर्भकाला हीटरजवळ नेले. बाळाच्या आजीने तिला विरोध केला तरी तिने बाळाला तिच्याकडे दिले नाही. नंतर आजीने नीतूला ३०० तर इतर परिचारिकेला २०० रुपये दिले. नवजात बाळाचे वडील लालचंद प्रजापत यांनी गुर्जर व इतर परिचारिकांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. (वृत्तसंस्था)
बक्षिसीसाठी नर्सने नवजात बाळाला हीटरजवळ धरले
By admin | Published: December 23, 2016 2:02 AM