नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला असून रुग्णालयातील नर्सिंग स्टाफचा मोठा हलगर्जीपणा पाहायला मिळाला आहे. ड्यूटी दरम्यान कूलर लावून नर्सिंग स्टाफ झोपल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामुळे एका रुग्णाचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाला आहे. वॉर्डमध्ये भरती असलेल्या रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी ही नर्सिंग स्टाफवर असते. मात्र रुग्णालयातील स्टाफने रुग्णांकडे लक्ष न देता झोप काढली.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बांदामधील जिल्हा रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयातील एका खोलीमध्ये कूलर लावून नर्सिंग स्टाफ झोपला होता. त्यांनी आतून दरवाजा लॉक केला होता. रुग्णाच्या नातेवाईकांनी नर्सिंग स्टाफला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. खोलीत झोपलेल्या स्टाफचा त्यांनी एक व्हिडीओ देखील तयार केला. पण याच दरम्यान उपचाराअभावी रुग्णांने आपला जीव सोडला आणि त्याचा मृत्यू झाला.
संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी दोषी असलेल्या स्टाफवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी राजा दादू नावाच्या 50 वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बर्न वॉर्डमध्ये राजा यांच्यावर उपचार सुरू होते. रात्रीच्या वेळी नर्सिग स्टाफ झोपला होता. याच दरम्यान रुग्णाची प्रकृती आणखी बिघडली आणि त्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी अनेक छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांना मदतीसाठी फोन केला पण कोणच आलं नाही असा दावा केला आहे.
रुग्णाच्या पत्नीने आणि भावाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री रुग्णाची प्रकृती बिघडली होती. मात्र यावेळी मेडिकल स्टाफ आरामात कूलर लावून झोपला होता. आम्ही खोलीबाहेरून खूप जोरजोरात आवाज दिला. पण कोणीच उठलं नाही. तसेच सकाळी सात वाजले तरी रुग्णाच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी कोणीच आलं नाही. याच दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आता चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.