नवी दिल्ली - अभिनेत्रीपासून राजकीय नेता बनलेल्या नुसरत जहां आणि मिमी चक्रवर्ती यांनी मंगळवारी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. या दोघींनी बंगाली भाषेत शपथग्रहण केली. कोलकाता येथील नुसरत जहांने नुकतेच उद्योगपती निखील जैन यांच्याशी लग्न केले आहे. लग्नानंतर तातडीने नुसरत जहांने लोकसभेच्या अधिवेशनासाठी उपस्थित झाली.
शपथग्रहणानंतर नुसरत जहांने माध्यमाशी बातचीत केली. नवीन वधू असलेली नुसरतने यावेळी गुलाबी रंगाची साडी आणि कपाळावर सिंदूर लावलं होतं. त्याचसोबत हातात बांगड्या आणि मेहंदीदेखील लावली होती. माईकजवळ येताच सर्वात आधी नुसरतने सहकारी खासदारांना अभिवादन करुन शपथग्रहण करण्यास सुरुवात केली. शपथ घेतल्यानंतर शेवटी जय हिंद, वंदे मातरम आणि जय बांग्ला असा उल्लेख केला.
नुसरत जहांनंतर तिची मैत्रिण आणि सहकारी खासदार मिमी चक्रवर्ती हिने बंगाली भाषेत शपथग्रहण केली.
मिमी चक्रवर्ती व नुसरत जहां ही नावे पश्चिम बंगालखेरीज अन्य राज्यांतील लोकांना कदाचित माहीतही नसतील. त्या दोघी बंगाली चित्रपट अभिनेत्री म्हणून तेथील लोकांना माहीत आहेत. पण आता त्यांना वेगळी ओळख मिळाली आहे. त्या दोघी तृणमूल काँग्रेसतर्फे लोकसभेवर निवडून आल्या आहेत. मिमी चक्रवर्ती या जादवपूर मतदारसंघातून, तर नुसरत जहां या बशीरहाट मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसविरुद्ध प्रचाराची राळ उठवली होती. पण मिमी चक्रवर्ती व नुसरत जहां या भाजप उमेदवारापेक्षा अडीच ते पावणेतीन लाख अधिक मते मिळवून विजयी झाल्या. मिमी यांचे वय आहे ३0, तर नुसरत जहां २९ वर्षांच्या आहेत.
निवडून आल्यानंतर त्या दोघी सोमवारी प्रथमच संसद भवनात गेल्या. त्यांनी तेथून आपली ओळखपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर बाहेर आल्यावर दोघींनी ओळखपत्रांसह आपली छायाचित्रे काढून घेतली. ती छायाचित्रे लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाली. खरेतर त्यांनीच ती इन्स्टाग्रामवर पोस्ट केली.
ती पाहून आनंद व्यक्त करण्याऐवजी लोकांनी त्यांच्यावर टीकेची झोडच उठवली. तुम्ही संसदेबाहेर उभ्या आहात, हे लक्षात ठेवा. तिथे काही फोटोशूट सुरू नाही. संसद हे कायदे बनवणाऱ्यांचे सभागृह आहे. त्याचा मान ठेवा, अशा असंख्य पोस्ट सोशल मीडियावर पडू लागल्या आहेत. वास्तविक अनेक नेत्यांची संसदेबाहेरील अशी छायाचित्रे यापूर्वी प्रसिद्ध झाली आहेत. पण त्यांच्यावर कोणीही टीका केली नव्हती. केवळ अभिनेत्री असल्यानेच ही बोलणी आपल्याला खावी लागत आहेत, हे या दोघा अभिनेत्रींच्या नंतर लक्षात आले.