ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १ - भारतातील खरी अस्वच्छता रस्त्यावर नसून, काही लोकांच्या मनामध्ये आहे. समाजाला दुभंगवणा-या 'ते' व 'आपण', तसेच 'शुध्द' व 'अशुध्द' या विचारामध्ये समस्येचे मूळ आहे असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. गुजरातच्या दौ-यावर असलेले राष्ट्रपती मुखर्जी साबरमती आश्रमातील कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
सार्वजनिक स्वच्छतेप्रमाणे आपण मनही स्वच्छ करुन गांधीजींच्या स्वप्नांची पूर्तता केली पाहिजे. अस्पृश्यता तसेच मैला वाहून नेण्याची प्रथा जो पर्यंत राहील तो पर्यंत ख-या अर्थाने स्वच्छ भारत प्रत्यक्षात साकारणार नाही असे राष्ट्रपती म्हणाले.
हिंसाचार, असहिष्णूतेच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रपती म्हणाले की दररोज मोठया प्रमाणावर हिंसाचार आपल्या आसपास होत असतो. या हिंसाचाराचा सामना करण्यासाठी आपण नवे मार्ग शोधले पाहिजेत. अहिंसा, चर्चेची ताकद आपण विसरता कामा नये. सध्या आपण ज्या वातावरणात रहात आहोत त्या वातावरणात आज गांधीजींच्या विचारांची सर्वाधिक आवश्यकता आहे असे मुखर्जी म्हणाले.