लखनौ - सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओ.पी.राजभर यांनी हिंदू-मुस्लिमसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजभर यांनी राजकीय नेत्यांवर दंगली भडकावण्याचा आरोप केला आहे. शिवाय,''आजपर्यंत जातीय दंगलींमध्ये केवळ सामान्य जनतेचाच का बळी जातो?, राजकीय नेते का मरत नाही?'' असा प्रश्नही राजभर यांनी उपस्थित केला आहे. अलीगडमधील एका सभेत संबोधित करताना ओ.पी.राजभर यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत.
ओपी राजभर म्हणाले की, 'हिंदू-मुस्लिमांच्या घडलेल्या दंगलींमध्ये आजपर्यंत एकतरी मोठा नेता मारला गेला आहे का?, नेते का मरत नाहीत? जे नेते हिंदू-मुसलमानांच्या नावावर तुमच्यामध्ये भांडणं लावतात, दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात, अशा नेत्यांनाही जाळून टाका. जेणेकरुन नेत्यांच्या सांगण्यावरुन आपण इतरांना जाळणार नाही, हे त्यांना चांगलंच समजेल.
पुढे ते असंही म्हणाले की, हे नेते हिंदू-मुसलमानांमध्ये फूट पाडतात. दोन समाजांमध्ये फूट पाडणाऱ्यांनी जरा भारताच्या संविधानाचाही विचार करावा. कारण राज्यघटनेने भारताचा नागरिक असणाऱ्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे नेतेमंडळींना कोणालाही देशाबाहेर काढता येऊ शकत नाही’.
राजभर यांचा सुहेलदेव बहुजन समाज पक्ष हा उत्तर प्रदेश सरकारमध्ये भाजपाचा मित्रपक्ष आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपाला एनडीएमधून बाहेर पडण्याची धमकी दिली होती.
लोकसभा निवडणूक एकत्रित लढवायची आहे की नाही याचा विचार करण्यासाठी राजभर यांनी भाजपाला 100 दिवसांचा कालावधी दिला आहे. भाजपाकडून वेळेत उत्तर आले नाही तर आमचा पक्ष सर्व 80 जागांवर निवडणूक लढवेल, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.