नवी दिल्ली : ईशान्येकडील तीन राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत प्रशंसनीय यश मिळवल्यानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी त्रिपुरा, नागालँड व मेघालयातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
मेघालय व नागालँडमध्ये ७ मार्चला, तर त्रिपुरा ८ मार्चला शपथविधी होणार आहे. या साेहळ्याला मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. मुख्यमंत्रिपदाच्या नावावर नेफ्यू रियो यांच्या नावावर शिक्कामाेर्तब झाले आहे.
त्रिपुरा : त्रिपुरातील भाजप-आयपीएफटी सरकारचा शपथविधी सोहळा ८ मार्च रोजी होणार आहे. त्रिपुरामध्ये भाजप-आयपीएफटी युतीने ३३ जागा जिंकून दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. माणिक साहा यांची मुख्यमंत्री म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे.
मेघालय : एनपीपी ५९ पैकी २६ जागा जिंकून मेघालयातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पण, पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. पक्षनेते संगमा यांनी अमित शाह यांना पाठिंब्यासाठी गळ घातली. त्यांनी त्वरित पाठिंबा दिला. त्यानंतर काेनराड संगमा यांनी पाठिंब्याचे पत्र सादर करून सरकार स्थापनेसाठी दावा सादर केला.
नागालँड : एनडीपीपी-भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्यालाही मोदी उपस्थित राहतील. ६० सदस्यीय राज्य विधानसभेच्या निवडणुकीत एनडीपीपी-भाजपने अनुक्रमे २५ व १२ मतदारसंघ जिंकून सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. परंतु, मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.