हरीश गुप्तानवी दिल्ली : त्रिपुरा, मेघालय, नागालँड या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा येत्या बुधवारी, ८ मार्च रोजी शपथविधी होणार आहे. त्या तीनही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. त्रिपुरामध्ये ६० सदस्य असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपने एकट्याने ३२ जागा जिंकल्या आहेत. तर इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी) या भाजपच्या घटक पक्षाने एका जागेवर विजय मिळविला. नागालँडमध्ये भाजप आघाडीने ६० पैकी ३७ जागा जिंकल्या.
मेघालयमध्ये कोन्राड संगमा यांच्या नेतृत्वाखालील एनपीपी पक्षाने ६० पैकी २८ जागा जिंकल्या व भाजपबरोबर सलग दुसऱ्यांदा आघाडी सरकार स्थापन केले. या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुका लढविल्या होत्या. ईशान्य भारतातील या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यानुसार या शपथविधी कार्यक्रमांच्या वेळा निश्चित केल्या जातील. पंतप्रधान मोदी त्रिपुरामध्ये जाहीर सभा घेण्याची व ईशान्य भारतातील राज्यांसाठी आणखी विकास प्रकल्पांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदी प्रतिमा भौमिक?
- मेघालय, त्रिपुरा, नागालँड या तीनही राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
- त्रिपुराचे विद्यमान मुख्यमंत्री माणिक साहा यांच्याऐवजी त्या पदावर प्रतिमा भौमिक (वय ५३ वर्षे) यांची भाजप पक्षश्रेष्ठी निवड करणार असल्याची चर्चा आहे.
- प्रतिमा भौमिक केंद्रीय सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्री आहेत. सध्या भाजपची सत्ता असलेल्या एकाही राज्यात महिला मुख्यमंत्री नाही. भौमिक यांना मुख्यमंत्री करून ती उणीव भरून काढण्याचा विचार आहे.
सरमा यांचे स्वप्न साकारत्रिपुरातील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आगरतळा येथील विवेकानंद मैदानात होणार आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचे (एनइडीए) अध्यक्ष आहेत. त्रिपुरा, नागालँड, मेघालयमध्ये भाजपप्रणित एनडीएला सत्ता मिळवून देणे हे सरमा यांचे स्वप्न साकार झाले आहे.