नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तीन दिवसांच्या दौऱ्याची सांगता करून भारतवासीयांचा निरोप घेण्यापूर्वी आर्थिक सहकार्याची आणि मित्रत्वाची हमी देतानाच विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करीत राहण्यासाठी धार्मिक एकोपा कायम ठेवा, असा सल्ला भारतीयांना दिला़ मंगळवारी दक्षिण दिल्लीच्या सिरीफोर्ट आॅडिटोरियममध्ये ओबामांनी देशातील निवडक मान्यवर आणि विद्यार्थ्यांना संबोधित केले़ आपल्या ३० मिनिटांच्या उत्स्फूर्त भाषणात बराक ओबामांनी उपस्थितांचीच नव्हे, तर संपूर्ण देशवासीयांची मने जिंकली़ अमेरिकेतील शिकागो येथे धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी ‘ब्रदर्स अॅण्ड सिस्टर्स आॅफ अमेरिका’ने भाषणाची सुरुवात केली होती़ या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करीत ‘ब्रदर्स अॅण्ड सिस्टर्स आॅफ इंडिया’ असे ओबामांनी म्हणताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला़ या भाषणात ओबामांनी धार्मिक स्वातंत्र्यासोबतच मानवाधिकार, स्वातंत्र्य, महिला सुरक्षा आणि भारत-अमेरिका संबंध अशा अनेक मुद्द्यांना हात घातला़ सर्व धर्म एकाच झाडाची फुले आहेत, या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वचनाचे स्मरण ओबामांनी केले़ येथे विविध जातीपंथांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि धार्मिक एकोपा कायम आहे, तोपर्यंत भारताचा विकास कुणीही रोखू शकत नाही, असे ओबामा म्हणाले़ > भारतीय सशस्त्र दलात महिलांचा सहभाग ही अविश्वसनीय बाब असून, माझ्या मनाला भावलेली एक चांगली बाब आहे. एखाद्या देशातील महिला प्रगती करतात, तेव्हाच तो देश यशस्वी होतो. - बराक ओबामा> गरिबी, तरुणाई आणि स्वप्नेगरिबांनाही स्वप्ने बघण्याचा अधिकार आहे, असे सांगत ओबामांनी आपल्या भाषणात व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्याला हात घातला़ या वेळी आपल्या आयुष्यातील काही घटनांचा उल्लेखही त्यांनी केला़ ते म्हणाले, मी आणि मिशेल अतिशय गरीब कुटुंबातून आलेलो आहोत़ शिष्यवृत्ती आणि शिक्षकांनी केलेले संस्कार या आधारावर आम्ही आज येथे आहोत़ माझ्या आयुष्यातही अनेक प्रसंग आलेत़ कातडीच्या रंगामुळे मला अनेकदा भेदभावाचे चटके सहन करावे लागले़ माझ्या आस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले़ भारतात एक चहा विकणारा पंतप्रधान झाला़ एका आचाऱ्याचा नातू राष्ट्रपती बनला़ अशा देशात तुम्ही राहता़ भारतात तरुणांची संख्या अधिक आहे आणि भारताचे तरुण देशाचे भविष्य घडवू शकतात़
छा गये ओबामा!
By admin | Published: January 28, 2015 5:30 AM