संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ओबीसींना आकर्षित करण्यासाठी भाजप व काँग्रेस मोठी खेळी खेळत आहेत. ओबीसींना आकर्षित करण्याची खेळी छत्तीसगढच नव्हे तर मध्य प्रदेश व राजस्थानमध्येही खेळली जात आहे. या राज्यांमध्ये जवळपास अर्धी लोकसंख्या ओबीसी असल्यामुळे ओबीसी मतदार कोणत्या पक्षाला समर्थन देतात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड या तीनही राज्यात ओबीसी मुख्यमंत्री असल्याने हाच मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
राजस्थानात सर्वांच्या नजरा
- राजस्थानमध्येही ओबीसी मतदारांकडे भाजप व काँग्रेसचे विशेष लक्ष आहे. राजस्थानमध्ये ५५ टक्के ओबीसी मतदार आहेत.
- या मतदारांकडे दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांच्या नजरा लागलेल्या आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट दोघेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओबीसी आहेत.
भाजपकडून मुख्यमंत्री, काँग्रेसकडून आरक्षण
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता छत्तीसगढच्या निवडणूक सभांमध्ये स्पष्टपणे सांगणे सुरू केले आहे की, भाजपचे सरकार आले तर एखाद्या मागासवर्गाच्या नेत्याला मुख्यमंत्री केले जाईल. काँग्रेसने २७ टक्के आरक्षण देण्याची घोषणा करून ओबीसीचा मुद्दा उपस्थित केला.
प्रचाराच्या पोस्टरवर आले राम मंदिर
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्याची एन्ट्री झाली आहे. भाजपने सर्व पाच राज्यांमध्ये अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिराच्या चित्रासोबत त्या-त्या राज्यातील नेत्यांची छायाचित्रे घेऊन राज्यात भाजपचे सरकार आणावे, असे आवाहन केले आहे. ५ राज्यांमध्ये पाठवण्यात येणाऱ्या होर्डिंग्जबरोबर स्थानिक राज्यांतील नेत्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. त्यावर अयोध्येत उभारले जातेय राम मंदिर, राज्यात बनणार भाजप सरकार, असे त्यावर लिहिले आहे. यावरून काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
ओबीसी मतदार-उमेदवार
राज्य मतदार भाजप काँग्रेसमध्य प्रदेश ४८% ६६ ६२ छत्तीसगड ४३.५% ३१ २९ राजस्थान ५५% — —