Indian Air Force:राजस्थानमधील जैसलमेरमधील पोखरणजवळील फील्ड फायरिंग रेंजमध्ये भीषण स्फोट झाला आहे. भारतीय वायुसेनेचे एक लढाऊ विमान पोखरण रेंजमधून जात असताना त्यातून एअर स्टोअर खाली पडले. त्यामुळे हा मोठा आवाज झाला. त्या स्फोटामुळे जमिनीत आठ फूट खोल खड्डा तयार झाला. आता त्या स्फोटाबाबत हवाई दलाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेत सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
राजस्थानच्या थार वाळवंटात असलेल्या पोखरण फायरिंग रेंजजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाला. पोखरण फायरिंग रेंजजवळ हवाई दलाच्या लढाऊ विमानातून एक एअर स्टोअर विमाना बाहेर आले. या घटनेनंतर मोठा आवाज झाल्याने खळबळ उडाली होती. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता तिथे आठ फूटांचा खड्डा झाला होता आणि लोखंडी गोल तुकडा तिथे पडला होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तो परिसर रिकामा केला. त्यानंतर या घटनेबाबात भारतीय हवाई दलाने माहिती दिली. त्याचबरोबर तपासाचे आदेशही देण्यात आले आहेत.
भारतीय हवाई दलाने दिलेल्या निवेदनानुसार, हवाई दलाच्या लढाऊ विमानातून एअर स्टोअर खाली पडले आहे. "तांत्रिक बिघाडामुळे पोखरण फायरिंग रेंज एरियाजवळ भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानातून एक एअर स्टोअर अनवधानाने बाहेर पडले. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही," असं भारतीय हवाई दलाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, हवाई दलाचे कोणते विमान होते, ते पोखरण रेंजजवळ का आले, या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. यात कोणीही जखमी झालेले नसले तरी मोठी दुर्घटना घडली नाही ही दिलासादायक बाब आहे. मात्र, मोठा स्फोट झाल्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर काही लोकांना स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर पोलीस स्थानिक लोकांसह घटनास्थळी पोहोचले होते.