शहरात १ कोटी एलईडी बल्ब वितरणाचे उद्दिष्ट रामराव मुंडे : एलईडी बल्बचे वितरण
By admin | Published: October 30, 2015 12:17 AM
पुणे : पुणे शहरातील सुमारे ११ लाख घरगुती वीजग्राहकांना पर्यावरणपुरक १ कोटी एलईडी बल्ब वितरणाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक वीजग्राहकांस एकूण १० एलईडी बल्ब वितरीत करण्यात येणार असल्याचे महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी सांगितले़
पुणे : पुणे शहरातील सुमारे ११ लाख घरगुती वीजग्राहकांना पर्यावरणपुरक १ कोटी एलईडी बल्ब वितरणाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक वीजग्राहकांस एकूण १० एलईडी बल्ब वितरीत करण्यात येणार असल्याचे महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी सांगितले़ केंद्र सरकार पुरस्कृत डोमेस्टिक इफिशियंट लायटिंग प्रोग्राम अंतर्गत घरगुती वीजग्राहकांना एलईडी बल्ब वितरणाच्या योजनेचे उद्घाटन करण्यात आले़ या कार्यक्रमात ते बोलत होते़ कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष सूयर्कांत पाठक, एनर्जी एफिशियंसी सर्व्हिसेसचे संचालक अरुणकुमार गुप्ता, प्रादेशिक व्यवस्थापक दीपक कोकाटे, महाऊर्जाचे व्यवस्थापक हेमंत पाटील, नगरसेवक अशोक येनपुरे, अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, शिवाजी चाफेकरांडे, नितीन गुजराथी, उल्हास शिंदे उपस्थित होते़ यावेळी सूयर्कांत पाठक यांनी सर्वप्रथम एलईडी बल्बची खरेदी केली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी १० वीजग्राहकांना एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले. ही योजना शहरासाठी येत्या ३ महिन्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेतून प्रत्येक घरगुती वीजग्राहकाला प्रत्येकी ७ वॅटचे १० एलईडी बल्ब वितरीत करण्यात येणार आहे. पुणे शहरात महावितरणचे सुमारे ११ लाख घरगुती वीजग्राहक आहेत. प्रत्येक ग्राहकास प्रत्येकी १०० रुपयांचा एक बल्ब असे एकूण एकूण १० बल्ब मिळतील. हे १० बल्ब रोख रक्कमेतून एकाच वेळी खरेदी करता येईल. यात हप्त्यांची योजना असून वीजग्राहकांना १० पैकी जास्तीत जास्त ४ एलईडी बल्ब हे प्रत्येकी १० रुपये ॲडव्हान्स भरून खरेदी करता येईल व या ४ बल्बचे उर्वरित प्रत्येकी ९५रुपये १० हप्त्यांत देता येईल. पहिल्या टप्प्यात रास्ता पेठ विभागातील विभाग, उपविभाग, शाखा तसेच महावितरणचे अधिकृत वीजबील भरणा केंद्र या ठिकाणी काऊंटर शुक्रवारीपासून सुरु होत आहेत. त्यानंतर पुणे शहरात सर्वच ठिकाणी ही योजना टप्प्याटप्प्याने अंमलात येणार आहे. थकबाकीदार नसलेल्या वीजग्राहकांनी चालू देयकासोबत ओळखपत्र, रहिवासी पुरावा दिल्यानंतर एलईडी बल्ब वितरीत करण्यात येतील. या बल्बची तीन वर्षांची वारंटी असून वारंटी काळामध्ये बल्ब बदलून मिळणार आहे. प्रत्येक बल्बच्या वापरातील वीजबचतीमुळे वार्षिक वीजबिलात सुमारे १८० रुपयांची बचत होणार आहे.