उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या नेतृत्वामुळे प्रभावित झालेला एक अल्पवयीन मुलगा त्यांना भेटण्यासाठी चक्क मुंबईतील राहत्या घरातून बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशमधील खंडवा रेल्वे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला संशयाच्या आधारावर पकडून चौकशी केली असता ही बाब समोर आली. ट्रेनमधून विना तिकीट फिरत असलेल्या या मुलाची मनस्थिती विचारात घेऊन रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या वडिलांना माहिती दिली आणि त्याला त्यांच्याकडे सुखरूप पोहोचवले.
बाल कल्याण समिती अध्यक्ष प्रवीण शर्मा यांनी याबाबत सांगितले की, खंडवा रेल्वे सुरक्षा बलाला मागच्या रात्री मागच्या रात्री मुंबईहून लखनौला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एक अल्पवयीन मुलगा एकट्याने विनातिकीट प्रवास करत असताना सापडला. त्याची संशयास्पद स्थिती पाहून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तो मुंबईहून कुटुंबीयांना न सांगता लखनौला जात असल्याचे समोर आले. तसेच तो सोशल मीडियावर नेत्यांचे व्हिडीओ सतत पाहायचा, अशी माहितीही समोर आली.
हा मुलगा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वावर खूप प्रभावित झाला होता. तसेच त्याला अखिलेश यादव यांच्यासारखाच नेता व्हायचं होतं. त्यासाठी तो लखनौला जाऊन अखिलेश यादव यांची भेट घेण्याच्या प्रयत्नात होता.
यादरम्यान, रेल्वे पोलिसांनी त्याला खंडवा रेल्वे स्टेशनवर उतरवले आणि बाल कल्याण समितीकडे सोपवले. या समितीने या मुलाच्या वडिलांशी संपर्क साधला. तसेच त्यांना बोलावून या मुलाला त्यांच्याकडे सोपवले. या मुलाचे वडील मुंबईमध्ये सुतारकाम करतात. त्यांनी सांगितले की, माझ्या मुलावर नेत्यांचा खूप प्रभाव आहे. तसेच त्याला नेता व्हायचं आहे. तो अखिलेश यादव यांच्या नेतृत्वावर थोडा अधिकच प्रभावित आहे.