- हरीश गुप्ता नवी दिल्ली - भाजपकडून राज्यसभेचे खासदार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, एस. जयशंकर, भूपेंद्र यादव आदींना लोकसभेची निवडणूक लढविण्यास सांगितले जाऊ शकते. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचीही अशी इच्छा आहे की, पक्षाच्या राज्यसभेच्या काही खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे. मात्र, त्यांची ही इच्छा गंभीर समस्येत अडकली आहे.
राहुल गांधी यांची इच्छा आहे की, दीपेंद्र हुड्डा (हरियाणा), रणदीप सुरजेवाला (राजस्थान), के.सी. वेणुगोपाल (राजस्थान), दिग्विजय सिंह (मध्य प्रदेश), रणजित रंजन (छत्तीसगड) आणि इम्रान प्रतापगढी (महाराष्ट्र) अशा अनेक राज्यसभा खासदारांनी निवडणूक लढवावी. काँग्रेस नेतृत्वाला वाटले की, हे तरुण आहेत आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांची पकड आहे.
दीपेंद्र हुड्डा यांनी २०१९ मध्ये रोहतक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि अतिशय कमी फरकाने ते पराभूत झाले. त्याचप्रमाणे रणदीप सुरजेवाला हे हरयाणातील लोकप्रिय नेते आणि एआयसीसीचे सरचिटणीस असून ते निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांनाही राजस्थानमधून राज्यसभेवर पाठविण्यात आले, तसेच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे दिग्विजय सिंह २०१९ मध्ये भोपाळमध्ये पराभूत झाले आणि नंतर त्यांना राज्यसभेत पाठविण्यात आले.
राहुल गांधी यांनी बिहारमधील नेत्या रंजिता रंजन यांना छत्तीसगडमधून राज्यसभेवर पाठवले. उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची जागा मिळाली.