ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - काश्मिरमधल्या गंभीर स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन बाळगलं असून काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी संसदेत जोरदार टीका केली. पण महत्त्वाची घटना घडल्यावर त्याबाबत मौन पाळणं हे मोदींनी याआधीही अनेकवेळा केलं आहे. त्यादृष्टीने ही पहिली घटना नाही. भाजपाच्या नेत्यांनी योग्य त्या वेळी महत्त्वाच्या मुद्यांवर मोदी बोलले असल्याचा दावा केला आहे. भाजपाने नेहमीच मनमोहन सिंग यांना मौनावरून लक्ष्य केलं होतं, आता विरोधक तीच टिका मोदींवर करत आहेत. याआधी अशा पाच घटना घडल्या ज्यावेळी मोदींनी मौन बाळगल्याची टिका विरोधकांनी केली. या घटना पुढीलप्रमाणे:
1 - जुलै 2016 - हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बु-हान वनी याला सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारल्यानंतर काश्मिरमध्ये जनता व सुरक्षा रक्षक यांच्या तुंबळ धुमश्चक्री झाली. आत्तापर्यंत 45 जणांनी जीव गमावला असून तिथली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मात्र, पंतप्रधानांनी याबद्दल अद्याप संसदेच्या अधिवेशनात सहभाग घेतलेला नाही.
2 - फेब्रुवारी 2016 - रोहित वेमुलाची आत्महत्या आणि जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारची अटक या प्रकरणी प्रचंड राजकीय वाक्युद्ध रंगलं. देशभर हे चर्चेचे विषय होते, परंतु मोदींनी यासंदर्भातही भाष्य करणं टाळलं.
3 - जून 2015 - क्रिकेटच्या विश्वातली बडी असामी ललित मोदी संदर्भात प्रचंड वादळ उठलं. मोदीला इंग्लंडला जाण्यासाठी भाजपा नेत्यांनी मदत केली तसेच यात प्रचंड घोटाळा असल्याचे आरोप झाले. याप्रकरणीही नरेंद्र मोदींनी भाष्य करणं टाळलं.
4 - ऑक्टोबर 2015 - मोहम्मद इखलाखची बीफ बाळगल्याचा संशय घेत जमावानं हत्या केली. यावरून देशभर गदारोळ झाला, चर्चासत्रे झडली. पंतप्रधानांनी अशा घटनांच्या विरोधात भूमिका मांडली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली, परंतु मोदींनी मौन बाळगणं पसंत केलं.
5 - धर्मांतरविरोधी विधेयकाला सगळ्या राजकीय पक्षांनी सहमती द्यायला हवी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केली यावरून राजकीय गदारोळ झाला. सरकारची यासंदर्भात काय भूमिका आहे ते स्पष्ट करावं अशी मागणी विरोधकांनी केली, परंतु पंतप्रधानांनी यासंदर्भातही मौन पाळणं स्वीकारलं.