Shiv Jayanti 2025: जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींपासून राजकारण्यापर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा मोठी चूक केली आहे. शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा देताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधी एक्स पोस्टमधून शुभेच्छा देताना मोठी चूक केली आहे.
शिवजयंतीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देशभरातली अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही एक्स पोस्टवरुन शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवरायांना आदरांजली वाहण्याऐवजी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली या शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता या पोस्टवरुन नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील," असं राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल - अतुल भातखळकर
"जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात. पण राहुल गांधी हे नेहमीच देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महापुरुषांविषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात. त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे. ही पोस्ट त्यांनी तात्काळ मागे घ्यावी. आदरांजली शब्दाचा वापर करावा अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल," असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.