नवी दिल्ली - संसदेच्या या वरिष्ठ सभागृहाने अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत. तसेच इतिहास बनवला आहे. एवढेच नाही तर गरज पडल्यावर इतिहास बदलण्यातही यश मिळवले आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेच्या योगदानाची प्रशंसा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे हे ऐतिहासिक २५० वे अधिवेशन आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेला संबोधित करून वरिष्ठ सभागृहाने संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘’राज्यसभेच्या २५० व्या अधिवेशनाच्या या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार बनण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे. त्यासाठी संसदेच्या या वरिष्ठ सभागृहाने अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत. तसेच इतिहास बनवला आहे. एवढेच नाही तर गरज पडल्यावर इतिहास बदलण्यातही यश मिळवले आहे.
''स्थायित्व आणि विविधता ही राज्यसभेची दोन वैशिष्ट्ये आहेत. लोकसभा विसर्जित होते, पण राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, तसेच ती होणारही नाही. येथे राज्यांचे प्रतिनिधित्व निश्चित होते. त्यामुळे येथे विविधता दिसून येते. तसेच निवडणूक प्रक्रियेतून सभागृहात येऊ न शकणाऱ्या गुणवान व्यक्तींना या सभागृहात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. त्यांचे गुण, अनुभव यांचा देशाला फायदा होतो,'' असे मोदींनी सांगितले.
जीएसटी कायदा मंजुरी, तिहेरी तलाक विरोधी कायदा तसेच कलम ३५ अ आणि कलम ३७० रद्द करण्यासारख्या ऐतिहासिक निर्णयांवेळी राज्यसभेने घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती, असेही मोदींनी सांगितले.