नवी दिल्ली : प्रदूषण आणि वाहतूक कोंडी या समस्यांवर उपाय म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पुन्हा सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम 4 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान लागू होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात दिल्लीच्या आसपासच्या राज्यात गवत जाळले जाते. त्यामुळे दिल्लीत मोठ्याप्रमाणत प्रदूषण होते. या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी पुन्हा सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
आम्ही प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र आणि पंजाब सरकारसोबत आपल्या स्तरावर काम करत आहोत. मात्र, यावर दिल्ली सरकार शांत बसणार नाही. गेल्या वर्षांमध्ये नोव्हेंबर महिन्यात सम-विषम फॉर्म्युला लागू केल्यामुळे राज्यातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अजून प्रदूषण कमी करण्याचा दिल्ली सरकारचा प्रयत्न असणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यासंदर्भात जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. तसेच, एक्सपर्ट्ससोबत चर्चा केली होती. दिवाळीत फटाक्यांमुळे धूराचे प्रमाण वाढते. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांना आवाहन आहे की, फटाके फोडू नका. सुप्रीम कोर्टाचाही तसा आदेश आहे. याशिवाय, प्रदूषण संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी वॉररुम सुद्धा तयार करण्यात येणार आहे, असेही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.