नवी दिल्ली - दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू होणार आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. दिल्लीतील प्रदूषणात वाहनांच्या धुराचा सहभाग असल्याने राज्याला ही समस्या भेडसावत आहे. अशातच शेजारच्या राज्यात शेतकरी पराली जाळत असल्याने प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनांसाठी सम-विषम नियम लागू करून सरकारने काही प्रमाणात प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
गाडीच्या क्रमांकाचा शेवटचा आकडा सम असेल तर सम दिवसांना रस्त्यावर फिरण्याची अनुमती असेल. तसेच विषम आकड्यांसाठी लागू असेल. रविवार वगळता दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत वाहतुकीसाठी हा नियम लागू असणार आहे. यातून दुचाकींना सवलत देण्यात आली आहे. तसेच रुग्णवाहिका, स्कूल बस, महिला यांना यातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय व्हीआयपींनाही या नियमातून वगळण्यात आले आहे. दिल्ली सरकारने नियमांची सविस्तर माहिती जाहीर केली असली तरीही काही प्रमाणात स्पष्टतेचा अभाव असल्याने दिल्लीकरांमध्ये संभ्रम कायम आहे.
दिल्लीतील प्रदुषणात आत्यंतिक धोकादायक पातळीपर्यंत रविवारी सकाळी वाढ झाली. गेल्या काही दिवसांत इतकी वाढ प्रथमच झाली आहे. त्याचा मोठा फटका विमानसेवेला बसला. दाट धुक्यामुळे दृश्यमानताही कमी झाली होती. त्यामुळे दिल्ली येथे येणारी 37 विमाने अन्यत्र वळविण्यात आली. दिल्लीतील हवेच्या दर्जाचा निर्देशांक (एक्यूआय) 610 इतक्या धोकादायक पातळीवर पोहोचला. त्यामुळे नॉयडा, ग्रेटर नॉयडा, गाझियाबाद परिसरातील सर्व सरकारी, खासगी शाळा व शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसेसही मंगळवारपर्यंत बंद राहाणार आहेत. या बसेस प्रदुषणात मोठी भर घालत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दिल्ली-एनसीआर भागामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची परिस्थिती असल्याचे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने (ईपीसीए) जाहीर केले. या भागामध्ये 5 नोव्हेंबरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास ईपीसीएने मनाई केली आहे. तसेच प्रदूषण आणि खराब हवामानामुळे दोन दिवस नोएडातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. प्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच भाजपाच्या एका मंत्र्यांनी अजब विधान केलं आहे.
दिल्ली आणि आसपासच्या राज्यांतील प्रदूषणावर भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री सुनील भराला यांनी अजब उपाय सुचवला आहे. प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी इंद्रदेवाला खूश करा आणि यज्ञ करा, ते सगळं काही ठीक करतील, असा उपाय भराला यांनी सांगितला आहे. 'प्रदूषणाच्या समस्येला 'पराली'ला जबाबदार ठरवणं म्हणजे हा थेट शेतकऱ्यांवरच हल्ला आहे. ऊस आणि डाळींचं उत्पादन घेतल्यानंतर शेतात कचरा होतो. शेतकरी ते पेटवून देतात. त्यामुळे धूर होतो. मात्र यामुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जबाबदार धरू नये' असं सुनील भराला यांनी म्हटलं आहे.