Odisha Crime : ओडिशात बलात्कार पीडितेची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीने बलात्कार पीडितेची निर्घृणपणे हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीच्या मृतदेहाचे छोटे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. मात्र, पोलिसांनी आरोपीला पकडले आहे. या सगळ्या प्रकारानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर आरोपीने पीडितेचाच खून केला आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुनू किशनला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुंदरगड जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पीडितेने धारुआडीह पोलीस ठाण्यात कुनूविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र जामीनावर बाहेर आल्यानंतर आरोपीने हादरवणारं कृत्य केल्याचे समोर आलं आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आरोपीची जामिनावर तुरुंगातून सुटका झाली होती. शिक्षा टाळण्यासाठी त्याने पीडितेच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे. आरोपीने मुलीचे झारसुगुडा येथून अपहरण करून राउरकेला येथे तिची हत्या केली होती. ओडिशा पश्चिम रेंजचे आयजी हिमांशू लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या कुटुंबीयांनी मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवल्यानंतर ही हत्या उघडकीस आली.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती मुलीला मोटरसायकलवरून घेऊन जाताना दिसत होते. दोघांनी हेल्मेट घातले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. ही मुलगी सुंदरगढ जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून, झारसुगुडा शहरात ती एका नातेवाईकाच्या घरी राहात होती. पोलिसांना बलात्कार प्रकरणातील आरोपी कुनू किशनची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस कुनूपर्यंत पोहोचले.
चौकशीदरम्यान, कुनूने मुलीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली दिली. आधी कुनूने मुलीचा मृतदेह ब्राह्मणी नदीत फेकल्याचा दावा केला होता. मात्र नंतर मृतदेहाचे तुकडे करून हनुमान बटीका-तरकेरा धरणाजवळील चिखलात फेकल्याचे कबूल केले. ओडिशा डिझास्टर रॅपिड ॲक्शन फोर्ससह शोध पथकांनी आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणाहून मुलीचे जाकीट आणि इतर पुरावे जप्त केले आहेत.
दरम्यान, मुलीच्या छिन्नविछिन्न शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी सापडले आहेत. तिच्या शरीराचे खालचे अवयव एका ठिकाणी सापडले, तर धडासह इतर भाग ब्राह्मणी नदीच्या काठावर पॉलिथिनच्या पिशवीत सापडला. पोक्सो कायद्यांतर्गत शिक्षा टाळण्यासाठी मुलीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली आरोपी कुनूने दिली.