२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जेवढ धक्कादायक लागले आहेत. तेवढेच धक्कादायक निकाल हे ओदिशा विधानसभा निवडणुकीमध्येही लागले आहेत. ओदिशामध्ये मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील बीजू जनता दल पक्षाची सत्ता उलथवून लावत भाजपाने येथे स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. एवढंच नाही तर २४ वर्षांपासून ओदिशाचं मुख्यमंत्रिपद सांभाळत असलेल्या नवीन पटनाईक यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. ओदिशामधील कांताबांजी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार लक्ष्मण बाग यांनी नवीन पटनाईक यांचा पराभाव केला आहे.
नवीन पटनाईक हे मागच्या २४ वर्षांपासून मुख्यमंत्रिपदी होते. तसेच ओदिशाचं सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद सांभाळण्याचा विक्रमही नवीन पटनाईक यांच्या नावावर आहे. १९९८ मध्ये अस्का लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत नवीन पटनाईक विजयी झाले होते. मात्र तेव्हापासून अपराजित असलेल्या नवीन पटनाईक यांना या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. एकेकाळी ओदिशाच्या राजकारणात अजेय वाटणाऱ्या नवीन पटनाईक यांचा कारकिर्दीत पहिल्यांदाच पराभव झाला आहे. नवीन पटनाईक यांना भाजपाच्या लक्ष्मण बाग यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. हे लक्ष्मण बाग हे १५ वर्षांपूर्वीपर्यंत मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते.
या निवडणुकीत लक्ष्मण बाग यांना ९० हजार ८७८ मतं मिळाली. तर नवीन पटनाईक यांना ७४ हजार ५३२ मतं मिळाली. अशा प्रकारे लक्ष्मण बाग यांनी १६ हजार ३४४ मतांनी नितीश कुमार यांचा पराभव केला. लक्ष्मण बाग हे कांताबाजी विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्याने अडल्यानडलेल्या मदत करत असतात, या कामांमुळेच त्यांचा विजय झाल्याचे सांगण्यात येत आहे.
लक्ष्मण बाग यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला होता. त्यांच्या कुटुंबाला रोजच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागत होता. त्याच्या कुटुंबात सहा भावंडं होती.त्यानंकर लक्ष्मण बाग यांनी एका ट्रक ड्रायव्हरसाठी क्लीनर म्हणून काम पाहिले होते. आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्यांनी मोलमजुरीही केली. नंतर त्यांनी ट्रक खरेदी केला आणि आपली आर्थिक स्थिती सुधारली.
लक्ष्मण बाग यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. तर २०१९ मध्ये ते केवळ १२८ मतांनी पराभूत झाले होते. मात्र यावेळी त्यांनी पराभवाची मालिका खंडित करत विजय मिळवला.