नवी दिल्ली - देशात अनेक घटना या सातत्याने घडत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मंत्र्यांना बाईकवरून घेऊन जाणं एका आमदाराला चांगलंच महागात पडलं आहे. ओडिशाचे शालेय आणि जनशिक्षण मंत्री समीर रंजन दास आणि बालासोरचे आमदार स्वरूप कुमार दास यांना बालासोरमध्ये बाईकवर हेल्मेट न घातल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. मंत्र्यांना मागे बसवून आमदार बाईक चालवत होते. मंत्री आणि आमदार शाळांची पाहणी करणार होते. याच दरम्यान रस्त्यात त्यांना वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेट पकडलं.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार स्वरूप कुमार दास हेल्मेटशिवाय बाईक चालवत होते. त्यांच्या मागे शिक्षणमंत्री समीर रंजन दास बसले होते. दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं. ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसाने बाईक मालकाच्या नावावर एक हजार रुपयांचं चलन फाडलं आहे. मंत्री महोदयांनी नंतर वाहतूक पोलीस स्टेशनला भेट देऊन दंड भरला. मंत्र्यांनी शहरातील विविध शाळांना अचानक भेटी दिल्या.
आमदारांसह बालासोर टाऊन हायस्कूल आणि बाराबती गर्ल्स हायस्कूलला भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी त्यांच्या गरजांबाबत चर्चा करून शाळांमध्ये उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. आमदारांनी देखील आम्ही हेल्मेट घातलं नव्हतं असं म्हणत आपली चूक मान्य केली आहे. नियमानुसार आम्ही एक हजार रुपये दंड जमा केला. भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नाही असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.