- ओडिशातील बालासोर येथील भीषण अपघातात जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाला असून १ हजारांहून अधिकजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून अनेकांना घरी सोडण्यात आलं आहे. तर, काहींवरही गंभीर असल्याने उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत अनेकजण सुदैवाने बचावले आहे. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण खऱ्या अर्थाने खरी ठरल्याचं अनेक उदाहरणांतून समोर आलं. अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी दुर्घटनेत काही अशा घटनांमुळे थोडासा दिलासा मिळतोय. तर, या अपघातातून ज्यांचा जीव वाचला त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा सर्वात मोठा भाग्याचा क्षण ठरला.
कोरोमंडल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका १६ वर्षीय मुलासाठी त्याच्या आईचं प्रेम सर्वार्धाने नवं आयुष्य देणारं ठरलं. आई तुझा आशीर्वाद... असंच काहीसं म्हणावं लागेल. ज्यामुळे, अपघात झालेल्या बोगीत सीट असतानाही जॉर्ज तिथं नव्हता. कोरोमंडल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचं नशिबच थोर म्हणावं लागेल. बेरहामपूर येथील जॉर्ज जॅकब दास याने नुकतेच १० वीची परीक्षा पास केली आहे. आपल्या आई-वडिलांसोबत तो कोरोमंडल एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. त्यावेळी, आई-वडिलांचे रिझर्व्हेशन कोच बी २ मध्ये होते. तर, जॉर्ज जॅकब दास याला कोरोमंडल एक्सप्रेसच्या बी८ मध्ये सीट मिळाली होती. मात्र, त्याच्या आई-वडिलांना जॉर्जला बी८ मध्ये बसण्यास विरोध करत टीसीकडे त्याचे सीट बदलून देण्याची विनंती केली. मात्र, त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर, वडिल ईजेकील दास यांनी त्याला त्यांच्याच जागेवरुन प्रवास करण्याचा सल्ला दिला.
विशेष म्हणजे जॉर्जची सीट बदलण्याची विनंती करण्यासाठी ते जॉर्जला घेऊन बी८ मध्ये जाणार होते. मात्र, जॉर्जच्या आईने रात्री ८ नंतर जेवण केल्यावर तू तिकडे जा, असे सूचवले. त्यामुळे, जॉर्ज आई-वडिलांपाशी बी २ मध्येच राहिला. दरम्यान, रेल्वे अपघात झाल्याचा आवाज झाला आणि ते ज्या बोगीत होते ती बोगीही जागेवर हलायला लागली होती. जेव्हा रेल्वे थांबली आणि बाहेर येऊन पाहिलं असता, सर्वत्र हात-पाय पसरल्याचं दिसून आलं. अनेकांचे मृतदेह रुळाजवळच पडले होते. नशिब बलवत्तर म्हणून ईजेकील हे कुटुंबासह घरी परत आले. त्यावेळी, त्यांना बी ८ मधील अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तर, याच बोगीतील अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत.
आईच्या निर्णयामुळेच जॉर्ज बी ८ मध्ये न जाता आई-वडिलांजवळ बी २ मध्ये राहिला. सुदैवाने त्याचा जीव वाचला. मात्र, घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून देव तारी त्याला कोण मारी... किंवा आई तुझा आशीर्वाद... म्हणूनच १६ वर्षीय जॉर्ज जॅकब दासला नवजीवन मिळालं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.