नवी दिल्ली - ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली, त्यानंतर हावडा एक्सप्रेसनेही जोरदार धडक दिली. या ३ ट्रेनच्या अपघाताचे भयावह फोटो आता समोर येत आहेत. त्यामुळे मृतदेहांची काय अवस्था झाली असेल याचा अंदाजही लावणे कठीण आहे.
आधी, ३०, ५०, ७० पाहता पाहता मृतांचा आकडा आता २०७ वरून २८० वर पोहचला आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार ९०० लोक जखमी आहेत अशी माहिती ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली. रात्रभर याठिकाणी बचावकार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज ओडिशाला जाणार असून त्याठिकाणी रेल्वे अपघात घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. सैन्यदलही बचाव कार्यात सहभागीशनिवारी सकाळी उजेड आल्यानंतर घटनेचे चित्र अधिक स्पष्ट झाले. बहनगा बाजार परिसरात रात्रभर किंकाळ्या ऐकायला मिळत होत्या. रेल्वेच्या डब्यांच्या ढिगाऱ्यात अजूनही अनेक मृतदेह अडकल्याचे समोर आले आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसचे अनेक एसी डबे पुढच्या रुळावर उलटले, त्यामुळे त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. बोगींमध्ये अडकलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागला, तर नुकसान झालेल्या बोगींमध्ये अनेक जखमी अडकले आहेत. बचावकार्यात लष्करानेही मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसचे जे डबे मालगाडीला धडकले त्या डब्यातून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत.
राज्यात दुखवटा घोषितमुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी रेल्वे अपघाताबाबत मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार ३ जून रोजी राज्यात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ३ जून रोजी संपूर्ण राज्यात कोणताही सण साजरा केला जाणार नाही. ओडिशाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली आहे.
रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीओडिशामध्ये झालेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघाताप्रकरणी विरोधकांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सरकार केवळ लक्झरी गाड्यांवर लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप सीपीआय खासदाराने केला आहे. खासदार बिनॉय विश्वम म्हणाले की, 'सरकारचे लक्ष केवळ लक्झरी गाड्यांवर आहे. सर्वसामान्यांचे गाड्या आणि ट्रॅक दुर्लक्षित आहेत. ओडिशातील मृत्यू त्याचेच परिणाम आहेत. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईक क्रास्टो यांनीही रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.