ओदिशामधील रेल्वे अपघातानंतर हजारो प्रवाशांनी रद्द केली तिकिटं, काँग्रेसच्या आरोपांना रेल्वेचं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 09:39 PM2023-06-06T21:39:15+5:302023-06-06T21:39:55+5:30
Odisha Coromandel Express Accident: ओदिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातावरून आता राजकारण पेटले आहे.
ओदिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातावरून आता राजकारण पेटले आहे. या रेल्वे अपघातानंतर हजारो प्रवाशांनी आपली रेल्वे प्रवासाची तिकिटं रद्द केल्याचा दावा काँग्रेसने केला होता. हा दावा आता आयआरसीटीसीने फेटाळून लावला आहे. काँग्रेसचे एख नेते भक्तचरण दास यांनी ओदिशामधील बालासोर येथे तीन ट्रेनना झालेल्या अपघातानंतर तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्या वाढल्याचा दावा केला होता. आयआरसीटीसीने काँग्रेस नेत्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच हा दावा चुकीचा असून, तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्या वाढलेली नाही, असे सांगितले आहे.
काँग्रेस नेते भक्तचरण दास यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बालासोरमधील अपघातानंतक हजारो लोकांनी आपली ट्रेनची तिकीट रद्द केली आहेत. गेल्या काही काळात एवढा मोठा अपघात कधी झालेला नाही. मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकार अधिकृतपणे २७५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत आहे. मात्र अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहेत. हजारो लोक जखमी झालेले आहेत. हजारो लोकांनी आपली तिकिटं रद्द केली आहेत. या अपघातानंतर रेल्वे प्रवास सुरक्षित राहिलेला नाही.
त्यांचं हे वक्तव्य काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला होता. त्यालाच रीट्विट करत आयआरसीटीसीनं उत्तर दिलं आहे. शुक्रवार, २ जून रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतरचा तिकीट बुकिंग आणि रद्दीकरण डेटा सादर केला आहे. यात म्हटलं आहे की, वरील आरोप हा चुकीचा आहे. रद्दीकरण वाढलेलं नाही. तर रद्दीकरण घटकेलं आहे. १ जून रोजी ७.७ लाख तिकिटं रद्द झाली होती. तर ३ जून रोजी ७.५ लाख तिकिटं रद्द झाली.