ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर केवळ तिथली सत्ताच बदलली नाही तर त्याठिकाणच्या प्रत्येक गोष्टीत बदल दिसत आहे. माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक २४ वर्ष सत्तेत होते, त्यामुळे राज्यातील बऱ्याच गोष्टी तशाच होत्या. २००० साली पटनायक यांनी राज्याची सत्ता हाती घेतली परंतु आजतागायत या राज्यात मुख्यमंत्र्याचे कुठलेही अधिकृत निवासस्थान नाही.
नवीन बाबू यांचे सरकार पूर्ण कामकाज त्यांच्या राहत्या नवीन हाऊसमधूनच पाहत होते. ते सरकारी निवासस्थानी शिफ्ट होण्याऐवजी त्यांच्या घरीच राहत होते. तिथूनच ते मंत्रालयीन कामकाज करायचे. मागील अडीच दशकापासून ते वर्क फ्रॉम होम करत होते. सरकारी घरात न जाण्याचा त्यांचा एक मोठा निर्णय होता. त्यांचे वडील बीजू पटनायक यांनी राजधानी भूवनेश्वर येथे एक शानदार बंगला बांधला होता. त्याच बंगल्यात नवीन बाबू राहत होते. मुख्यमंत्रिपदाची सर्व जबाबदारी नवीन पटनायक याच बंगल्यातून सांभाळायचे.
लोकसभा निवडणुकीसोबतच ओडिशा राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आणि राज्यातील नवीन पटनायक यांची सत्ता उलथवली. आता मुख्यमंत्री कोण यासाठी भाजपा नेत्यांची बैठक पार पडत आहे. परंतु त्याचसोबत राज्यातील अधिकारी नव्या मुख्यमंत्र्यासाठी घराचा शोधही घेत आहेत. मुख्यमंत्र्यांना सोयीस्कर पडेल अशा बंगल्याचा शोध अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. त्यासाठी अनेक बंगले पाहिले आहेत. परंतु त्यांचे काम सुरू आहे. एक बंगला नवीन पटनायक यांचा तक्रार कक्ष असायचा जिथे नवीन बाबू मुख्यमंत्री असताना जनतेला भेटायचे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यासाठी बंगला शोधण्यासाठी अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. सध्या मुख्यमंत्री निवासस्थान नसल्याने नवीन होणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील गेस्ट हाऊसमध्ये विशेष राहण्याची सुविधा तयार केली जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन पटनायक यांच्याआधी २ मुख्यमंत्री हेमानंद बिस्वाल आणि जानकी बल्लभ पटनायक एका छोट्या बंगल्यात राहायचे. १९९५ मध्ये जेपी पटनायक हटल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय १-२ मजली भवनात शिफ्ट केले. त्याच भवनात नवीन पटनायक यांचा लोकहिताचा तक्रार कक्ष होता. त्यानंतर २००० मध्ये नवीन पटनायक मुख्यमंत्री झाल्यापासून ते स्वत:च्या घरीच राहून कामकाज सांभाळायचे.