भुवनेश्वर - फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला होता. या चक्रीवादळात आतापर्यंत 64 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला. ओडिशातील पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले होते. घरे, रस्त्यावरील वाहने व झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या. पुरी शहरातील बराच भाग पाण्याखाली गेला होता. मोठ्या प्रमाणात ओडिशाचे नुकसान झाले. फनी या चक्रीवादळामुळे तब्बल 9336 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
स्पेशल रिलीफ कमिशनर (एसआरसी) ने दिलेल्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळादरम्यान 6643.63 कोटींच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच वादळामुळे नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी जवळपास 2692.63 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक मालमत्तेची नुकसान भरपाई आणि इतर कार्यासाठी तब्बल 9336 कोटींची आवश्यकता आहे. त्यामुळे ओडिशा सरकारने हा खर्च पूर्ण करण्यासाठी एनडीआरएफकडे 5227.68 कोटींची मागणी केली आहे.
फनी चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता तो अद्याप सुरळीत सुरू झालेला नाही. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून ओडिशा राज्याला 1 हजार कोटींची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली होती. त्याचसोबत मृतकांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये देण्याचं आश्वासनही दिलं होतं. तर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी फनी चक्रीवादळामुळे ज्या लोकांची घरं उद्धवस्त झाली आहेत अशा लोकांना पक्की घरे देण्याची घोषणा केली आहे.
ओडिशा येथील 11 जिल्ह्यातील 14, 835 गावांना फनी वादळाचा तडाखा बसला आहे. मागील 24 तासात 13.41 लाखांपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील आपत्कालीन परिस्थिती पाहता मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी प्रभावित झालेल्या लोकांना विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. नवीन पटनायक यांनी ''तीव्र' फटका बसलेल्या खुर्दा जिल्ह्याच्या उर्वरित भागातील कुटुंबांना तांदळाचा एक महिन्याचा कोटा, 1 हजार रुपये आणि पॉलिथिन शीट्स मिळणार आहेत. वादळाचा 'कमी' फटका बसलेल्या कटक, केंद्रपाडा व जगतसिंगपूर हे जिल्हे तांदळाचा एक महिन्याचा कोटा आणि 500 रुपये मिळण्यास पात्र राहतील' असे म्हटले आहे. तसेच फनी या चक्रीवादळामुळे पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी 95100 रुपये तर कमी नुकसान झालेल्या घरांसाठी 5200 रुपये आणि किरकोळ नुकसान झालेल्या घरांसाठी 3200 रुपयांची मदत देण्याचीही घोषणा पटनायक यांनी केली.