कटक : ओडिसा सरकारच्या पशुपालन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालक रत्नाकर राऊत यांनी हा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांसाठी 'भाई' शब्द वापरल्यास त्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालक रत्नाकर राऊत यांच्या आदेशाची 16 नोव्हेंबरला अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये कार्यालय परिसरात वरिष्ठांच्यासमोर आल्यानंतर आपले म्हणणे मांडताना कनिष्ठ अधिकारी आणि फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शिष्टाचार पाळला पाहिजे, असे म्हटले आहे. तसेच, या अधिसूचनेचे पालन केले नाही तर संबंधीत कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही म्हटले आहे.
दरम्यान, कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून राज्य संचालक आणि फिल्ड कार्यालयातील आपल्या वरिष्ठांशी व्यवहार करताना सभ्यता पाळली जात नसल्याचे निदर्शनास आले. उदाहरणार्थ, तांत्रिक अधिकारी आपल्या वरिष्ठ उपविभागीय पशुवैद्यकीय अधिकारी, मुख्य जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी आणि सह संचालकांसाठी 'भाई' शब्दाचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालक रत्नाकर राऊत यांनी यासंबंधीचा आदेश काढला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा प्रकारे संबोधने उचित नाही. हे फक्त ओडिसा सरकार सेवा (वर्तणूक) नियम 1959 चे उल्लंघन नाही, तर अतिक्रमण आहे, अशी प्रतिक्रिया पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालक रत्नाकर राऊत यांनी दिली आहे.