भुवनेश्वर - 2014 मध्ये देशात भले मोदी लाट उसळली होती, परंतु ओडिशातील 21 पैकी 20 जागांवर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलानं आपला झेंडा फडकवला होता. त्यांची ही ताकद लक्षात घेऊन, यावेळी त्यांना 'काँटे की टक्कर' देण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसनं कट्टर तयारी केली होती. मोदींसाठी तर ही लढाई प्रतिष्ठेची आहे. त्यात त्यांना यश येतं, की यावेळीही ओडिशाची जनता बीजू जनता दलालाच साथ देते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांच्या तुलनेत ओडिशातून कमी खासदार लोकसभेत जात असले, तरी यावेळी तेच निर्णायक ठरू शकतात, असं जाणकारांनी सूचित केलंय. बीजू जनता दलाने गेल्या निवडणुकीप्रमाणेच मुसंडी मारली आणि इकडे त्रिशंकू निकाल लागला, तर देशाचा नायक ठरवण्यात नवीन पटनायक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अर्थात, आपण कुणासोबत आहोत किंवा कुणासोबत जाऊ, हे त्यांनी अजूनही गुलदस्त्यातच ठेवलं आहे.
'फनी' वादळानंतर मोदी सरकारला 'नवीन' बळ; सत्तेचं गणित होणार सोपं?
फनी चक्रीवादळानं ओडिशामध्ये हाहाकार उडवला. या चक्रीवादळात ४१ जणांचा मृत्यू झाला असून मोठी वित्तहानीही झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिस्थितीची हवाई पाहणी करून १ हजार कोटींची तातडीची मदतही जाहीर केली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. फनी चक्रीवादळाआधी नागरिकांच्या स्थलांतराचे आणि नंतर मदत आणि पुनर्वसनाचे काम ओडिशा सरकारने उत्तम प्रकारे केल्याचं प्रशस्तीपत्रक नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायक यांना दिलं होतं. त्यांच्या या पत्राला पटनायक यांनी उत्तर पाठवलंय आणि त्यात केंद्राचे आभार मानलेत. गरजेच्या वेळी राज्याच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामात एकमेकांवर टीकास्त्र सोडणाऱ्या या दोन नेत्यांमधील हे कौतुकाचे बोल भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतात, असं जाणकारांना वाटतंय.