काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 11:21 AM2024-05-04T11:21:50+5:302024-05-04T11:22:42+5:30
loksabha Election - काँग्रेस पक्षाकडून कुठलंही आर्थिक पाठबळ न मिळाल्याने उमेदवाराने निवडणूक लढण्यास नकार दिल्याची घटना ओडिशा येथे घडली आहे.
नवी दिल्ली - सूरत, इंदौरनंतर आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ओडिशातील पुरी इथं काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. पक्षाकडून कुठलाही आर्थिक पाठिंबा मिळत नाही. पार्टी फंडिंगशिवाय निवडणूक प्रचार करणं मला शक्य नाही. त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेतेय. पक्षानं दिलेलं तिकीट मी परत करतेय असं सुचारिता मोहंती यांनी म्हटलं आहे.
पुरी येथे भाजपाकडून संबित पात्रा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याठिकाणी काँग्रेसच्या सुचारिता मोहंती यांनी पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाळ यांना पत्र लिहून म्हटलंय की, पक्षाकडून फंडिंग देण्यास नकार दिल्यानं संपूर्ण लोकसभा मतदारसंघात प्रचारावर परिणाम झाला आहे. मी पक्षाचे प्रभारी अजॉय मेहता यांना ही बाब कळवली. त्यांच्याकडून काही सोय करण्यास सांगितले असं त्यांनी पत्रात उल्लेख केला.
तसेच मी एक पगारदार प्रोफेशनल पत्रकार होती. १० वर्षापूर्वी मी राजकारणात प्रवेश केला आहे. मी पुरी मतदारसंघात प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. मी प्रगतशील राजकारणासाठी मोहिम हाती घेतली परंतु त्यात फारसं यश आलं नाही. मी प्रचारासाठी लागणारा अंदाजित खर्चही कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही जास्त काही बदल झाला नाही. मी माझ्या वैयक्तिक बळावर पैसे जमा करू शकत नाही. त्यासाठी मी आपले आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे दरवाजे ठोठावले. मतदारसंघात प्रभावशाली प्रचारासाठी आवश्यक फंडची गरज आहे. फंडिंग कमी असल्याने आपला विजय मागे पडत आहे अशी खंत सुचारिता मोहंती यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पक्षाच्या फंडिंगशिवाय मला प्रचार अभियान सुरू ठेवणे कठीण आहे. त्यासाठी मी काँग्रेसची उमेदवारी परत देते. माझ्या मतदारसंघात ७ विधानसभा मतदारसंघ येतात, तिथेही जाणुनबुजून कमकुवत उमेदवार मैदानात उतरवले आहेत. मी पक्षाकडे ४ उमेदवार बदलण्याची मागणी केली. तेव्हा पक्षाने तुम्ही तुमच्या बळावर निवडणूक लढा असं सांगितले. परंतु पैसाशिवाय मला ही निवडणूक लढणे शक्य नाही असं सांगत सुचारिता मोहंती यांनी पक्षाला तिकीट परत केले.