माणसे दारू पितात, हे सर्वांनाच माहित आहे. पण, तुम्हाला सांगितलं की, हत्तीही दारू पितात, तर तुमचा विश्वास बसेल का? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण हत्तींनाही दारू आवडते. ओडिशातील हत्तींना महुआ(देशी दारू) आवडते. ओडिशातील केओंझार जिल्ह्यातील एका गावात हत्तीनी दारू पिल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिलीपाडा काजू जंगलात महुआपासून बनवलेली दारू पिऊन 24 हत्ती गाढ झोपल्याचे ग्रामस्थांना दिसले.
केओंझार जिल्ह्यातील शिलीपाडा काजूच्या जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, ते अनेक वर्षांपासून जंगलात महुआपासून देशी दारू बनवतात. दारू बनवण्यासाठी ते जंगलात गेले होते, तिथे त्यांनी महुआची फुले पाण्यात आंबवण्यासाठी. सकाळी सहा वाजता ते दारू घेण्यासाठी आले असता, सर्व भांडी रिकामी दिसली. भांड्यातील आंबवलेले पाणीही गायब होते. यावेळी त्यांना तिथे 24 हत्ती झोपल्याचे दिसले. या हत्तींनी हे आंबवलेले पाणी पिल्याचे ग्रामस्थांना लक्षात आले.
गावकऱ्यांनी सांगितले की, दारू पूर्णपणे बनलेली नाही. महुआपासून दारू बनवण्याची प्रक्रिया सुरुवातीच्या टप्प्यात होती. यावेली ग्रामस्थांनी हत्तींना उठवण्याचा प्रयत्न केला, पण हत्ती काही उठले नाही. यानंतर गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तींना जागे करण्यासाठी ढोल ताशा वाजवला. वनविभागाच्या कर्मचार्यांनी खूप प्रयत्न केल्यानंतर हत्ती जागे झाले आणि जंगलात निघून गेले.