ओडिशा राज्यात रशियन नागरिकांच्या संशयास्पद मृत्यूचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीय. आज, मंगळवारी आणखी एका रशियन नागरिकाचा मृत्यू झाल्याने ओडिशात खळबळ उडाली आहे. सर्गेई मिल्याकोव्ह (वय 51) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो मालवाहू जहाजाचा मुख्य अभियंता होता. जगतसिंहपूर जिल्ह्यातील पारादीप बंदरावरील एका मालवाहू जहाजात सर्गेईचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून, रिपोर्ट आल्यावरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.
यापूर्वी दोन जणांचा मृत्यूविशेष म्हणजे, गेल्या महिन्यात ओडिशात दोन दिवसांत दोन रशियन नागरिकांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. यामध्ये करोडपती रशियन खासदार पावेल अँटोनोव्ह यांच्या नावाचा समावेश आहे. पावेल अँटोनोव्ह हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर टीकाकार होते. त्यांनी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून त्यांचा मृत्यू झाला.
याच्या एक दिवस आधी पावेल यांचा मित्र व्लादिमीर बिदेनोव्ह यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाशेजारी अनेक दारुच्या बाटल्या पडलेल्या होत्या. पण, त्यांच्या मृत्यूबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, मित्राच्या मृत्यूमुळे निराश झालेल्या पावेल यांनी उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आत्महत्या की, हत्या याचा तपास सीआयडी करत आहे.
सर्गेईचा मृत्यू नेमका कशाने?पारादीप पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष पीएल हरनाध यांनी सांगितले की, मुख्य अभियंता सर्गेई मिल्याकोव्ह यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली असून, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. बांगलादेशच्या चितगाव बंदरातून निघालेले हे जहाज पारादीप मार्गे मुंबईला जात होते. सध्या याबाबत अधिक तपास सुरू आहे.