नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,49,65,463 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,81,386 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 4,106 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,74,390 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या संकटात नातेवाईकांनी कोरोना रुग्णांकडे पाठ फिरवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तसेच मृतदेह स्वीकारण्यासही नकार दिला आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. याच दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या भीतीनं गावकऱ्यांनी थेट पोलीस आणि अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
ओडिशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान कोरोनामुळे मयूरभंज जिल्ह्यातील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाग्रस्ताचा मृतदेह हा अंत्यविधीसाठी गावात आणण्यात आला. त्यावेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या पोलिसांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना गावातील लोकांनी मारहाण केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. तसेच कोरोनाच्या भीतीने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्याला विरोध दर्शवला. पोलीस आणि प्रशासनाचे काही अधिकारी गावात आले असता गावकऱ्यांनी त्यांना घेरलं.
गावकऱ्यांनी कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्कारावरून अधिकाऱ्यांशी वाद घातला आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मयूरभंजचे पोलीस अधीक्षक स्मिथ परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी ठाकुरमुंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सात आरोपींना न्यायालयीन चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ओडिशामध्ये कोरोना वेगाने प्रसार होत आहे. नव्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या ओडिशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाखांहून अधिक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! रुग्णालयाने कोरोना मृतांचा आकडा लपवला; 19 दिवसांत तब्बल 65 जणांच्या मृत्यूने खळबळ
देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर सध्या उपचार सुरू आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये एका खासगी रुग्णालयाने कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा लपवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 19 दिवसांत तब्बल 65 रुग्णांचा मृत्यू झाला मात्र रुग्णालयाने हे महत्त्वाची माहिती लपवून ठेवल्याचं समोर आलं आहे. आरोग्य विभागाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वार येथील बाबा बर्फानी रुग्णालय प्रशासनाने कोरोना संक्रमित रुग्णांच्या मृत्यूची नेमकी माहिती आरोग्य विभागाला दिलेली नाही. कोरोना रुग्णाच्या मृत्यूची सूचना ही 24 तासांच्या आत राज्याच्या कोविड कंट्रोल रुमला देण्याचे निर्देश सरकारच्या वतीने कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना देण्यात आले आहेत. बाबा बर्फानी रुग्णालयात 25 एप्रिल ते 12 मे पर्यंत उपचारादरम्यान 65 रुग्णांचा मृत्य़ू झाला आहे.