बोलंगीर: ओडिशातील बोलंगीर जिल्ह्यातील पटनागढ भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेमुळे सात मुली बेशुद्ध झाल्याची घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना बापूजी हायस्कूलमध्ये घडली. बेशुद्ध झाल्यानंतर मुलींना तातडीने जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या मुलींची प्रकृती स्थिर झाली.
शाळेत उशिरा आल्यामुळे दिली शिक्षा मिळालेल्या माहितीनुसार, बापूजी हायस्कूलमधील काही विद्यार्थी प्रार्थना संपल्यानंतर उशीरा शाळेत आले. यामुळे बिकाश धारुआ नावाच्या शिक्षिकेने त्या विद्यार्थ्यांना 100 सिट-अप करायला लावल्या. इतकी मोठी शिक्षा दिल्यामुळे काही विद्यार्थी बेशुद्ध पडले. यानंतर शाळेतील शिक्षकांनी त्यांना तात्काळ पटनाग उपविभागीय रुग्णालयात दाखल केले.
शिक्षणमंत्र्यांचे चौकशीचे आदेश पटनागढचे उपविभागीय वैद्यकीय अधिकारी पीताबश शा म्हणाले, "विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणले तेव्हा त्यांची प्रकृती ठीक नव्हती. परंतु प्राथमिक उपचारानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर झाली आहे." दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शालेय आणि जनशिक्षण मंत्री समीर रंजन दास यांनी घटनेची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पटनागढचे सामुदायिक शिक्षण अधिकारी शंकर प्रसाद मांझी यांना चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.