नवी दिल्ली - एका विद्यार्थ्याने देसी जुगाड करून कमाल केली आहे. देशातला सर्वात लहान फ्रीज (Smallest Fridge) तयार केला गेला आहे. ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील सालापूर भागात राहणाऱ्या कमल किशोर माझी (Amal Kishor Majhi) याने देशातील आतापर्यंतचा सर्वांत लहान फ्रीज तयार केला आहे. यासाठी त्याचं नाव 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्येही (India Book of Records) नोंदवलं गेलं आहे. कमल बीटेकच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने यापूर्वीही अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार केल्या आहेत. विद्यार्थ्याने बनवलेल्या देशातील या सर्वांत लहान फ्रीजबद्दल जाणून घेऊया.
कमलने हा फ्रीज एल्युमिनियम शीट, ब्रशलेस कूलिंग फॅन, हीट सिंक, थर्मो-इलेक्ट्रिकल मॉडेल, सेफ्टी ग्रिल, 12 व्ही डीसी मोटर, सॉकेट्स आणि एलईडीचा वापर करून तयार केला आहे. फक्त 12.7 सेमी लांब, 10.3 सेमी रुंद आणि 20.5 सेमी उंचीचा हा फ्रीज आहे. एवढा लहान फ्रीज बनवण्याची कल्पना कशी सुचली, याबाबत कमलला विचारलं असता त्याने सांगितलं की, कोरोनाच्या संकटात आपल्याला हा छोटासा फ्रीज बनवण्याची कल्पना सुचली. लस, इंजेक्शन, औषधं आणि इतर वैद्यकीय वापरासाठी, तशा वस्तू साठवण्यासाठी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी फ्रीज आवश्यक आहे पण हे फ्रीज खूप महाग असतात.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं नाव
वैद्यकीय वस्तू इतर ठिकाणी नेण्यासाठी लहान आणि स्वस्त फ्रीज आवश्यक आहे असं वाटलं. आपल्यामधल्या कल्पकतेला अधिक वाव देता येईल आणि आपल्या नावावर रेकॉर्ड नोंदवता येईल, असाही विचार करूनही फ्रीज तयार केल्याचं कमलने सांगितलं आहे. फ्रीज भारतातला सर्वात लहान फ्रीज मानला जात आहे. यामुळेच कमल किशोर माझी याचं नाव आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं आहे. कमलने याआधी मिनी व्हॅक्यूम क्लीनर आणि फूट-यूज हँड सॅनिटायझर अशी काही उपकरणं बनवली आहेत. हा फ्रीज ही त्याची चौथी निर्मिती आहे.
फ्रीज फक्त 1500 रुपयांमध्ये करण्यात आला तयार
फ्रीजचं दुसरं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे, हा फ्रीज फक्त 1500 रुपयांमध्ये तयार करण्यात आला आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठीही हा फ्रीज अत्यंत उपयुक्त आहे. हा फ्रीज स्वस्त तर आहेच; पण तो एका साध्या बॅटरीवरही चालू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातल्यांनाही हा फ्रीज वापरणं सोपं होईल. कमल किशोर माझी याने याआधी मिनी व्हॅक्यूम क्लिनर, पायांनी वापरता येईल असं सॅनिटायझरचं मशीन तयार केलं आहे. त्याच्या या क्रिएटिव्हिटीचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.