ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यात प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सर्व अनोळखी मृतदेह शास्त्रोक्त पद्धतीने ओळखण्यासाठी एम्समध्ये जतन करण्यात आले आहेत. तसेच ओडिशाच्या विविध रुग्णालयांमध्ये २०० हून अधिक लोक उपचार सुरु असून इतर जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोमंडल एक्सप्रेस २ जून रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास एका थांबलेल्या मालगाडीवर धडकली. अपघातात त्याचे बहुतांश डबे रुळावरून घसरले. त्यानंतर त्याचवेळी जाणाऱ्या बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसच्या डब्यांशी त्याचे काही डबे आदळले. अपघातामागे मानवी चूक, सिग्नल बिघाड आणि इतर संभाव्य कारणांचा शोध सुरू आहे. ते लवकरच उघड होईल. मात्र याचदरम्यान ट्रेनचा अपघात होण्याच्या काही सेकंद आधीचा व्हिडिओ समोर आला आहे.
ओडिशा रेल्वे अपघाताचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सफाई कर्मचारी ट्रेनची साफसफाई करत असताना एक प्रवासी त्याचा व्हिडीओ शूट करत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर जोरदार हादरा बसतो आणि ट्रेनमध्ये अचानक सर्वकाही उलटंपालटं होतं. हा व्हायरल व्हिडीओ अपघाताच्या काही सेकंदापूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे.
४० प्रवाशांचा विजेचा धक्का लागून मृत्यू
कोरोमंडल एक्स्प्रेसमधून बाहेर काढलेल्या सुमारे ४० मृतदेहांवर जखमेच्या कोणत्याही खुणा नाहीत आणि त्यांचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाला असावा, असे रेल्वे पोलिसांनी म्हटले आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, अपघाताच्या वेळी तुटलेल्या थेट ओव्हरहेड वायर्स काही डब्यांमध्ये अडकल्या आणि त्यात अडकलेल्या प्रवाशांना विजेचा धक्का बसला.