ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहानगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात 207 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, 900 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना बालासोरसहित विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने कलिंग टीव्हीला सांगितले की, "आम्ही ट्रेनमध्ये बसलो होतो. अचानक डबा वेगाने हलू लागला आणि तो उलटला. अपघातानंतर माझ्या गावातील अनेक लोक सापडत नाहीत. हा अपघात कसा झाला हे आम्हाला माहीत नाही?" अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये असलेल्या गोविंद मोंडल नावाच्या आणखी एका प्रवाशाने न्यूज18 बांग्लाला सांगितले, "मला वाटलं होतं की आता आम्ही सर्व मरणार आहोत. तुटलेल्या खिडकीच्या मदतीने आम्ही डब्यातून बाहेर पडलो. मी सर्व आशा सोडल्या होत्या. तुटलेल्या खिडकीतून डब्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झालेल्या काही प्रवाशांपैकी मी एक आहे."
"आम्हाला प्रथमोपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. मी धोक्याबाहेर आहे पण मला काही जखमी लोक दिसले ज्यांची प्रकृती खूपच वाईट आहे." अपघातानंतर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यासोबतच अनेक गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत. रेल्वेकडून बचावकार्य सुरू आहे. मदत क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. जखमींना वाचवण्यासाठी आणि रुग्णालयात नेण्यासाठी रेल्वेचे पथक सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनीही एसआरसी नियंत्रण कक्षात पोहोचून घटनेचा आढावा घेतला आणि बचाव कार्य केले.
कोरोमंडल एक्स्प्रेस व मालगाडीच्या भीषण अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले आहेत. दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमींना 50 हजाराची मदत देण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.