ओडिशा ट्रेन अपघातात अनेकांनी आपल्या कुटुंबातील लोक गमावले. या दुर्घटनेच्या हृदयद्रावक कहाणी आता लोकांसमोर येत आहे. कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त झालं तर कुणाच्या डोक्यावरून आईवडिलांचे छत्र हरपलं. या अपघातात अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले त्यातील काहींनी आयुष्याची लढाई जिंकली. त्यात २४ वर्षीय विश्वजित मलिक याचाही समावेश होता. जो शवागृहापर्यंत जाऊनही वडिलांच्या इच्छेमुळे जिवंत राहिला.
टाईम्स रिपोर्टनुसार, विश्वजितला वडिलांनी काही तासांपूर्वी शालीमार स्टेशनवरून कोरोमंडल एक्सप्रेसमध्ये बसवले होते. तेव्हा पुढच्या काही तासांत असं काही घडणार आहे याची कल्पनाही नव्हती. इतक्या मोठ्या अपघातात मुलगा बळी पडला. आयुष्यासाठी त्याला लढाई करावी लागली. जेव्हा विश्वजितच्या वडिलांना ट्रेन अपघाताची बातमी मिळाली त्यांना धक्का बसला.
तात्काळ विश्वजितच्या वडिलांनी मुलाला फोन लावला. सुदैवाने जखमी असूनही त्याने फोन उचलला परंतु जास्त काही न बोलल्याने तो कुठे आहे कळाले नाही. विश्वजित गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्या वडिलांनी स्थानिक रुग्णवाहिकेला बोलावून थेट बालासोरसाठी रवाना झाले. जवळपास २३० किमी प्रवास करून ते बालासोर इथं पोहचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्वांनी मिळून विश्वजीतचा शोध सुरू केला असता तो कुठेच सापडला नाही. कालांतराने सर्वांच्या आशा पल्लवित होत होत्या पण विश्वजितचे वडील हिलाराम यांना आपला मुलगा जिवंत असल्याचा विश्वास होता. घटनास्थळी मुलाची विचारपूस केल्यानंतर हिलाराम जवळील शवागृहात गेला. जिथे प्राण गमावलेल्यांचे मृतदेह ठेवण्यात आले होते.
आधी आत जाण्याची परवानगी मिळाली नाही, नंतर काही वेळाने कोणाची तरी नजर एका मृतदेहावर पडली, ज्याचा उजवा हात थरथरत होता. हिलारामने हात पाहिल्यावर त्याला विश्वजीत दिसला. यानंतर विश्वजीतला तेथून तातडीने बाहेर काढून बालासोर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. दुखापत गंभीर होती, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला कटक मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले. मात्र, बॉण्ड भरल्यानंतर वडील आणि काकांनी विश्वजीतला सोबत घेत रुग्णवाहिकेतून कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचारासाठी आणले. पीडिताचे हात-पाय फ्रॅक्चरसह शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत.