ओडिशातील रेल्वे अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच पश्चिम बंगालमध्येही तशाच अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे. परंतू, यावेळी दोन्ही मालगाड्याच असल्याने जिवीतहानी टळली आहे. परंतू, महिनाही पूर्ण होत नाही तोच हा अपघात झाल्याने रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पश्चिम बंगालमध्ये बांकुडा रेल्वे स्थानकावर दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या. यानंतर डझनभर डब्बे रुळावरून घसरले. हा अपघात रविवारी पहाटे ४ वाजता ओंडा स्टेशनवर झाला आहे. यामध्ये एका मालगाडीच्या चालकाला जखमा झाल्या आहेत. पाठीमागून टक्कर दिल्याने मालगाडीचे १२ डब्बे घसरल्याचे सूत्रांनी सांगितले.
एक मालगाडी ओंडा स्टेशनवरून पुढे जात होती, तेवढ्यात पाठीमागून वेगाने येत असलेल्या दुसऱ्या मालगाडीने टक्कर दिली. मोठा आवाज झाल्याने आजुबाजुचे लोक झोपेतून जागे झाले आणि घटनास्थळी पोहोचले.
दोन्ही मालगाड्या रिकाम्या होत्या. अपघाताचे कारण काय आणि त्या कशा आदळल्या हे अद्याप समजलेले नाहीय. या अपघातामुळे आद्रा मंडळातील अनेक ट्रेन थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वे अधिकारी लवकरात लवकर या मालगाड्या हटविण्याचे काम करत आहेत. मालगाडीच्या जागी प्रवासी ट्रेन असती तर ओडिशातील बालासोर सारखाच भीषण अपघात झाला असता.