ओदिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे देशभरात शोकाचं वातावरण आहे. या अपघातात आतापर्यंत २८० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. हा अपघात म्हजणे कटकारस्थान असू शकतो, त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे, या अपघाताचं टायमिंग विचित्र आहे. या अपघाताचं विश्लेषण करण्याची गरज आहे, असे दिनेश त्रिवेदी म्हणाले.
माजी रेल्वेमंत्री त्रिवेदी यांनी सांगितले की, मी जे दृष्य पाहिलं, त्यातून आपण भूकंपानंतरचं दृश्य पाहतोय, असं वाटत होतं. जपानप्रमाणे दुर्घटनांमध्ये एकही मृत्यू होता कामा नये, हे आमचं लक्ष्य असलं पाहिजे. नवं तंत्रज्ञान येत आहे. त्याला रेल्वेच्या सिस्टिममध्ये दाखल करून घेतलं जात आहे.
त्रिवेदी यांनी पुढे सांगितले की, पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे २०१० मध्य एक मोठा रेल्वे अपघात झाला होता. या अपघातानंतर दहा वर्षांपर्यंत तिथे रेल्वे चालली नव्हती. या घटनेमध्ये गीतांजली एक्स्प्रेस आणि एका मालगाडीचा अपघात झाला होता. त्यात सुमारे १५० ते १८० जणांचा मृत्यू झाला होता. २०१० मध्य एका तपास आयोगाने या अपघाताचा उल्लेख मोठी दुर्घटना म्हणून केला होता.
ओदिशामधील बालासोर येथे झालेल्या या अपघातामध्ये आतापर्यंत २८० जणांचा मृत्यू झाला आहे. लष्कर, हवाई दलासह अनेक पथके बचाव मोहिमेत गुंतलेली आहे. ट्रेनच्या डब्यांमध्ये अजूनही काही लोक अडकलेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्रेनच्या डब्यांमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू, बाटल्या, चपला आदी वस्तू विखुरलेल्या होत्या. मदत कार्यामध्ये लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. तक दुसरीकडे मृतांच्या संख्येमध्येही सातत्याने वाढ होत आहे. अपघातग्रस्त डब्यांमध्ये एमर्जंन्सी अलार्म अजूनही वाजत आहे. तसेच अपघातग्रस्त डब्यांमध्ये अनेक लोक अडकलेले असल्याची शक्यता आहे.