ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली, त्यानंतर हावडा एक्सप्रेसनेही जोरदार धडक दिली. या ३ ट्रेनच्या अपघाताचे भयावह फोटो आता समोर येत आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या ढिगाऱ्याचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. एका शाळेत हे मृतदेह ठेवण्यात आले आहेत. या मृतदेहांमध्ये एक व्यक्ती कोणाचा तरी शोध घेत होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. पांढऱ्या चादरीने झाकलेल्या प्रत्येक मृतदेहाचा चेहरा उघडल्यानंतर ते पुन्हा बंद करत होते.
छिन्नविछिन्न मृतदेह, सर्वत्र किंकाळ्या, मृतांचा आकडा २८० वर पोहचला; PM मोदी ओडिशाला जाणार
एक मृतदेह पाहायचे, पुन्हा तो बंद करायचे. रात्रभर त्यांच हेच काम सुरू होते. अखेर त्या व्यक्तीने आपल्यावर आलेली आपबीती सांगितली. कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाचा ते शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. ही व्यक्ती होती ५३ वर्षीय आहे. त्यांचे नाव रवींद्र शॉ आहे. ते त्यांचा मुलगा गोविंदा शॉसोबत प्रवास करत होते. कुटुंबाचे १५ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी पिता-पुत्र दोघेही कमाईसाठी बाहेर पडले होते. मुलगा बेपत्ता आहे आणि आता वडील त्याचा शोध घेत आहेत.
रवींद्र शॉने यांनी सर्व घटना सांगितली. यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले होते. रवींद्र शॉ यांनी सांगितले की, ते आणि त्यांचा मुलगा बसून भविष्यात, किती कमवायचे आणि किती बचत करायची यावर चर्चा करत होते. ते त्यांचे कर्ज कधी फेडू शकतात याची चर्चा करत होते. तेवढ्यात अचानक बधिर करणारा मोठा आवाज आला आणि रेल्वे अपघात झाला.
रवींद्र यांनी सांगितले की, त्यानंतर त्यांना भानच राहिले नाही, काही मिनिटे अंधार पडला आणि मन सुन्न झाले. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा सर्व काही नष्ट झाले होते. सर्वत्र मृतदेह आणि मृतदेहांचे तुकडे पडलेले होते. या मृतदेहांमध्ये त्यांनी आपल्या मुलाचा शोध सुरू केला. यात कोणाचा तरी तुटलेला हात किंवा पाय दिसायचा आणि ते मुलाच्या शरीरात काही भाग आहे का हेही काळजीपूर्वक पाहायचे. मध्यरात्रीपर्यंत ते हताशपणे आपल्या मुलाचा शोध घेत होते. त्यानंतर ते मृतदेहाचा ढीग ठेवलेल्या ठिकाणी पोहोचले.
रवींद्र जवळच्या शाळेत पोहोचले तिथे मृतदेह झाकलेल्या अवस्थेत ठेवले होते. ते त्याच्यामध्ये गेले आणि एकामागून एक मृतदेह बघू लागले. मात्र त्यांना त्यांचा मुलगा सापडला नाही. रवींद्र तिथेच बसून रडायला लागले. काही लोकांनी त्यांचे सांत्वन करून त्यांना पाणी प्यायला दिले. ते तिथे गपचूप बसायचे आणि आलेले मृतदेह पाहण्यासाठी धावायचे. हे दृष्य पाहून अनेकांना रडू आवरत नव्हते.