ओडिशा रेल्वेअपघातानंतर अद्यापही बचावकार्य सुरू आहे. बचाव आणि मदत कार्यात अनेक जखमींना कटक, भुवनेश्वर आणि बालासोर येथील रुग्णालयात हलविण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती देताना, अपघातात 237 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाले असल्याची पुष्टी ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी केली आहे. हा भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडला. यात मालगाडी, हावडा एक्सप्रेस आणि कोरोमंडल एक्सप्रेस एकमेकांना धडकल्या. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून दोन लाख रुपये, तर रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वे मंत्रालय देणार 10 लाख -ओडिशात झालेल्या या भीषण अपघातात 237 जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून मृतांच्या नातलगांना नुकसानभरपाईची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. या अपघातातील मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याचबरोबर या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना दोन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. यासंदंर्भात बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "हा अपघात दुर्दैवी असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातलगांना प्रत्येकी 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये, तर किरकोळ जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल."
पीएमओनेही जारी केली मदत - पीएम मोदींनी ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांना 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पीएमओने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. "ओडिशा ट्रेन अपघातात मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातलगांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपयांची मदत केली जाईल. तसेच जखमींना रुपयांची मप्रत्येकी 50 हजार दत करण्यात येईल," असे या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे.
पंतप्रधान, राष्ट्रपतींना तीव्र दु:खकोरोमंडल एक्स्प्रेस व मालगाडीच्या भीषण अपघातात झालेल्या प्राणहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले आहेत.
वंदे भारत लोकार्पण रद्द : बालासोर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर शुक्रवारी (दि. ३ जून) होणारा मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचा गोवा राज्यातील मडगाव येथे होणारा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे.