Odisha Vigilance Raids: ओडिशामध्ये सरकारी अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईत मोठं घबाड हाती लागलं आहे. ओडिशा दक्षता विभागाने गुरुवारी कटक राज्य परिवहन प्राधिकरण उपायुक्ताच्या संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईत अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचे समोर आलं. अधिकाऱ्यांना या छापेमारीत २००० च्या नोटांचे बंडल, सोने चांदीचे दागिने आणि संपत्तीशी संबंधित अनेक कागदपत्रं सापडली आहेत.
राज्य परिवहन प्राधिकरणाचे उपायुक्त प्रदीप कुमार मोहंती यांच्याशी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ओडिशा दक्षता विभागाने नऊ ठिकाणी छापे टाकले होते. प्रदीप कुमार मोहंती यांच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता ठेवल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात ही कारवाई सुरु करण्यात आली होती. दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, १३ पोलीस उपअधीक्षक, १२ पोलीस निरीक्षक, २५ अधिकारी आणि इतर कर्मचारी यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली.
भुवनेश्वर इथल्या विशेष न्यायाधीशांनी यांनी जारी केलेल्या सर्च वॉरंटच्या आधारे प्रदीप कुमार मोहंती यांच्याशी संबधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये भुवनेश्वर, खोरधा, पुरी, नयागड आणि कटक येथील प्रदीप कुमार मोहंती यांच्याशी संबंधित नऊ ठिकाणी शोध घेण्यात आला. दक्षता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोहंती यांच्या भुवनेश्वरमधील मैत्री विहार येथील घर, रघुनाथपूर येथील चार बीएचके फ्लॅट आणि खोर्धा येथील टांगी येथील एका घरात तपासणी करण्यात आली. मालीपाडा येथील त्यांच्या नातेवाईकाच्या नावावर असलेला पेट्रोल पंप आणि पुरीमधील बालीखंड येथे बांधकामाधीन असलेल्या इमारतीचीही झडती घेण्यात आली.
त्याशिवाय, कटकमधील कार्यालयावर, नयागडमधील राणापूरमधील कुसुपल्ला येथील फार्महाऊस, भुवनेश्वरमधील गोविंदप्रसाद येथे पाच मजली बांधकामाधीन इमारत आणि पुरी शहरातील भक्ती रत्न लेन येथील त्यांच्या नातेवाईकाच्या घरावरही छापा टाकण्यात आला.