ऑनलाइन लोकमत
वडोदरा, दि. 10 - गोध्रा जवळील मोहलोल गावातील मंदिरात मुलींना प्रवेश न दिल्याच्या कारणामुळे मंदिरातील दोन पुजा-यांसहीत एकूण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुली दलित असल्यानं या पुजा-यांनी त्यांना मंदिरात प्रवेश करू दिला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
""नवभारत टाईम्स""नं दिलेल्या वृत्तानुसार, या मुलींनी गौरी व्रत केले होते यासाठी त्यांना मंदिरामध्ये पूजा करायची होती. मात्र दलित असल्याच्या कारणामुळे पुजा-यांनी त्यांना मंदिरात प्रवेश करू दिला नाही. दलित असल्यानं पुजा-यांनी मंदिरात पूजा करण्यापासून रोखलं, असा आरोप या मुलींनी केला आहे. या मुलींचे वडील गोपाल मोची यांनी घडल्या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असून व्रत सुरू होण्यापूर्वीच पुजा-यांनी मुलींना मंदिरात येऊ दिले नाही, अशी माहिती मुलींच्या वडिलांनी पोलिसांना दिली.
आणखी बातम्या वाचा
मोची यांनी सांगितले की, दोन दिवसांपासून पुजारी मुलींना मंदिरात येण्यापासून रोखत आहे. मात्र याबाबत मुलींनी आम्हाला काहीही सांगितले नव्हते. शनिवारी ( 7 जुलै ) जेव्हा प्रचंड गोंधळ झाला त्यावेळी सत्य परिस्थिती समोर आली. पुढे ते असेही म्हणाले की, पुजा-याला घडल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलो असताना त्यावेळी पुजा-याच्या मुलानं काही फरक पडत नसल्याचं सांगत हवे असल्यास पोलिसात जा, असे सांगत बोलण्यास टाळाटाळ केली.
शिवाय शिवीगाळ करत पुजा-याचा मुलगा असेही म्हणाला की, जर मुलींनी मंदिर प्रवेश केला असता तर परिसर अशुद्ध झाला असता. दरम्यान, मोची यांनी सांगितले की, आम्ही त्या मंदिरात जात नाही कारण आमचा समुदायाचे मंदिर वेगळे आहे, मात्र आमचे मंदिर बंद असल्यानं मुली या मंदिरात आल्या होत्या.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पुजा-यासहीत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्यापपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.