ऑनलाइन लोकमत
डेहरादून, दि. 10- उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यातील सतपुलीमध्ये रविवारी जातीय तणाव निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झाली होती. नजीबाबादचा रहिवासी असणाऱ्या वसीम नावाच्या एका भाजी विक्रेत्याने व्हॉट्सअॅप, फेसबूक या सोशल नेटवर्किंग साइटवर केदारनाथ मंदिराबद्दलचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केला होता. केदारनाथ मंदिराचा हा आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्यानंतर काही स्थानिक लोकांनी घोषणाबाजी करत वसीमच्या दुकानात पोहचले. त्या लोकांनी संपूर्ण सतपुली बाजार बंद करत या घटनेला विरोध दर्शवायला सुरूवात केली. स्थानिक नागरीकांच्या या विरोधाची माहिती मिळताच तो भाजी विक्रेता तरूण दुकान बंद करून फरार झाला. तुमच्या मुलाला स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात द्या, असं या आंदोलनकर्त्यांनी त्या तरूणाच्या वडिलांना सांगितलं होतं. पण तसं न झाल्याने संतप्त जमावाने पोलीस स्टेशनला घेराव घातला.
या घटनेची माहिती मिळताच कोटद्वार आणि पौरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलं परिस्थिती नियंत्रणात आणली. तसंच पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी या दोघांनीही घटनास्थळी पोहचत आंदोलनकर्त्यांशी आणि तेथिल प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
एका मुलाने केदारनाथ मंदिराबद्दल आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्यानंतर काही हिंदूत्त्वादी संघटनांचे कार्यकर्ते त्या मुलाच्या दुकानावर पोहचले होते. आंदोलनकर्त्या जमावामध्ये महिलांचाही समावेश होता. जवळपास एक हजारांच्या या संतप्त जमावाने फळ विक्रेत्या तरूणाच्या सामानाची तोडफोड करत सामान जाळून टाकलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पौरी, कोटद्वार आणि लॅसडाउनमधून मोठा पोलीस फाटा सतपुलीमध्ये तैनात करण्यात आला आहे.
आणखी वाचा
सध्या फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपी मुलाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्या मुलाची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे. त्याच्या घरच्यांशीही बोलणं झालं असून, मुलगा कुठे आहे हे त्यांनाही माहिती नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यावर जुवेलाइन अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला जाइल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच त्या मुलाच्या दुकानाची तोडफोड करणाऱ्या हिंदूत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा व्हिडीओ आणि फोटोच्या साहाय्याने शोध सुरू आहे, असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
केदारनाथ मंदिराबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरूणाला अटक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येते आहे. दरम्यान परिसरातील वातावरण सध्या शांत असून पोलिसांचा कडक पाहारा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.