मध्य प्रदेशातीलकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी, एफआयआर दाखल करण्यात आला आहे. संविधान, अल्पसंख्याक, दलित आणि आदिवासींचे भविष्य वाचवायचे असेल तर पंतप्रधान मोदींची हत्या करण्यासाठी तयार रहा. असे वादग्रस्त विधान पटेरिया यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामुळे पटेरिया यांची अडचण वाढली आहे. त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, आपले म्हणणे चुकीच्या पद्धतीने माडण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते राजा पटेरिया यांच्या वक्तव्यावर बोलताना, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, ‘काँग्रेसचे लोक मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करू शकत नाही. यामुळेच, काँग्रेसचे एक नेते हत्येसंदर्भात बोलतात. हे अत्यंत घृनास्पद आहे. काँग्रेसची खरी भावना आता प्रकट होऊ लागली आहे.’
ते ट्विट करत म्हणाले, ‘भारत जोडो यात्रेचे ढोंग करणाऱ्यांचे वास्तव आता समोर येत आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी जनतेच्या हृदयात आहेत. सम्पूर्ण देशात श्रद्धा आणि आस्थेचे केंद्र आहेत. काँग्रेसचे लोक मैदानात त्यांचा सामना करू शकत नाहीत. यामुळेच त्यांच्या हत्येच्या गोष्टी करतात.’
पटेरिया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल -पटेरिया यांच्या वक्तव्यानंतर, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, 'ही महात्मा गांधींची काँग्रेस नाही. ही इटलीची काँग्रेस आहे आणि इटलीची मानसिकता मुसोलिनीची मानसिकता राहिली आहे. ज्या पद्धतीने स्वरा भास्कर, कन्हैया कुमार त्यांच्या यात्रेत चालत आहेत, त्यावरूनही हे स्पष्ट होते. पटेरिया यांनी पीएम मोदींविरोधात केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह विधानासाठी मी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश देत आहे. नरोत्तम मिश्रा यांच्या सूचनेनंतर मध्य प्रदेशातील पन्ना येथे पटेरिया यांच्या विरोधात शांतता बिघडवणे आणि असंतोष पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हमाले होते राजा पटेरिया -राजा पटेरिया यांचा जो कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये ते काही कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. ते सांगतात की, मोदी निवडणुका संपुष्टात आणतील. मोदी धर्म, जात, भाषा यांच्या आधारावर फूट पाडतील. दलित आणि आदिवासींचं आणि अल्पसंख्याकांचं जीवन संकटात आहे. जर संविधानाचं रक्षण करायचं असेल तर मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा. मात्र नंतर त्यांनी या विधानावर सारवासारव केली. तसेच हत्येचा अर्थ पराभव असा सांगितला.