मुंबई - राज्यात विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. निकाल लागल्यानंतर सोमवार संध्याकाळपासूनच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. त्यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार गुजरातला थांबल्याचे आता समोर आले आहे. या शिवसेनेतील बंडावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार सध्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी दिल्लीत आहेत. तेथूनच त्यांनी राष्ट्रवादीची भूमिका जाहीर केली. तसेच, आपण आजच मुंबईला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपूर्वीही बंड करण्यात आला होता. त्यावेळी, आमदारांना हरयाणा आणि गुजरातमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, आता 2.5 वर्षांपासून सरकार व्यवस्थित चालत आहे. विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीची मतं ठरल्याप्रमाणे उमेदवारांना देण्यात आली आहेत. आमच्या महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी झाला नाही हे खरंय, याची आम्ही माहिती घेऊ, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे, असा प्रश्न शरद पवारांना विचारला होता. त्यावर, राज्यातील शिवसेनेच्या बंडावर बोलताना, मला सद्यस्थिती पाहून असं वाटतंय की नक्कीच मार्ग निघेल. शिवसेना पक्षाकडे मुख्यमंत्रीपद आहे, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीकडे आहे, ते मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहिल. शिवसेना नेते जे ठरवतील त्यासोबत आम्ही आहोत. पण, मला विश्वास आहे की, सर्वकाही व्यवस्थीत होईल, असे शरद पवार यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे हे अमित शहांना भेटणार आहेत, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर, कोणी कोणाची भेट घ्यावी, हा त्यांचा विषय आहे, मला याबाबत माहिती नाही. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही, मी मुख्यमंत्र्यांसोबतही याबाबत बोललो नाही. पण, मी आज मुंबईला जात आहे, तिथे गेल्यानंतर परिस्थिती पाहून पुढील पाऊले उचलली जातील, असेही पवार यांनी सांगितले.
आम्ही महाराष्ट्राचे निष्ठावंत
''पवार निष्ठावंत हा काय प्रकार आहे? पवार निष्ठावंत वगैरे प्रकार नसतो. सगळे महाराष्ट्राचे निष्ठावंत आहेत. बाळासाहेबांचे निष्ठावंत आम्ही आहोतच ना, हे आम्हाला तुम्ही शिकवू नका बाळासाहेबांची निष्ठा काय ते. तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, बाळासाहेब आज असते तर त्यांनीही या सरकारला आशीर्वाद दिला असता,'' असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला.
शिवसेना आमदारांना घेराव
शिवसेनेच्या आमदारांना घेराव घातला आहे. घेराव घातल्यामुळे त्यांना परत येता येत नाही. हा घेराव फक्त गुजरातमध्येच घातला जाऊ शकतो. या आमदारांना मुख्य रस्त्यावरचे रस्ते बंद केले आहेत. महाराष्ट्राला अस्थीर करण्याची योजना गुजरातच्या भूमिवर रचली जात असून हे दुर्दैवी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, सर्वच आमदार परत येतील, कारण ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत.